आरटीई प्रवेशाची वेबसाईट हँग; अर्ज करण्यास अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:59 AM2021-03-15T11:59:56+5:302021-03-15T12:00:04+5:30
RTE admissions website hangs ही वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने पालकांना अर्ज करण्यास अडचणी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत इंग्रजी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत; मात्र, ही वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने पालकांना अर्ज करण्यास अडचणी येत आहेत.
राज्य शिक्षण विभागांतर्गत मोफत शिक्षण कायद्याच्या अधीन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध होण्याच्या दृष्टीने इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी ३ ते २१ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. आपल्या पाल्याच्या प्रवेश अजार्साठी पालक ऑनलाईन सेंटरवर गर्दी करत आहेत. मात्र, ही वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने पालकांना ताटकळावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणे योग्य नाही. गेल्या आठ दिवसांपासून पोर्टल चालत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत तर दुसरीकडे सेवा केंद्रचालकदेखील त्रस्त झाले आहेत. पोर्टलवर तांत्रिक अडचणींची सूचना येत असून, लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, आठ दिवस होऊनही अडचण दूर झाली नाही. शिक्षण विभागाने तत्काळ कार्यवाही करून वेबसाईट सुरळीत करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.