‘आरटीओ’कडून २६ खासगी बसेसवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:37 PM2021-02-22T12:37:29+5:302021-02-22T12:37:38+5:30
RTO News वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २६ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यात खासगी बसेसची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान वेगवेगळ्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २६ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी गुजरातमधील एका खासगी बसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.
जिल्ह्यातून खासगी बसद्वारे अंतर्गत वाहतुकीसह इतर राज्यातदेखील प्रवासी वाहतूक करण्यात येते. या खासगी बसेससाठी शासनाने नियमावली तयार केली आहे. यानुसार बसची लांबी व रुंदी ठरवून देण्यात आली आहे. नियमापेक्षा जास्त लांबी व रुंदी असलेल्या बसेसवर कारवाई करण्यात येते. खासगी बसेसना टप्पा वाहतुकीचा परवाना देण्यात आलेला नाही. हा परवाना केवळ एसटी महामंडाळाच्या बसेसनाच देण्यात येतो.
त्यामुळे खासगी बसेसना एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत थेट वाहतूक करणे बंधनकारक असते. मधे कुठेही प्रवासी घेता येत नाहीत. खासगी बसेसच्या चालकांना वाहतुकीदरम्यान सर्व कागदपत्रसोबत बाळगणे व सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
यामध्ये शासनाने निश्चित केलेला ‘ड्रेसकोड’ परिधान करण्यासह पॅसेंजर यादी, वाहन योग्यता प्रमाणपत्र, आरसी बुक, परमिट, पीयूसी ही सर्व कागदपत्रे सोबत बाळगणे या नियमांचा समावेश आहे.
जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ५ व ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या तपासणी त २६ खासगी बसेस दोषी आढळून आल्या. यापैकी गुजरात पासिंग असलेल्या एका बसची लांबी व रुंदी नियमापेक्षा जास्त आढळून आली.
यामुळे या बसचे वाहन योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून ती बस जप्त करण्यात आली आहे. टप्पा वाहतुकीस परवानगी नसताना अशी वाहतूक करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चार बसेस आढळून आल्या. या सर्व खासगी बसेससह मालवाहतूक करणाऱ्या व इतर नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी बसेसच्या चालकांना दंड आकारण्यात आला आहे.