खासगी प्रवाशी वाहतूकीच्या विरोधात आरटीओची मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:38 PM2020-02-07T15:38:35+5:302020-02-07T15:38:53+5:30
दोन दिवसात जिल्ह्यात तीन बसगाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सुरक्षा मानकांना बगल देऊ होत असलेल्या खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने धडक मोहीम सुरू केली असून दोन दिवसात जिल्ह्यात तीन बसगाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. येत्या काळात ही मोहिम अधिक तेज करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
प्रामुख्याने कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये स्लीपर कोच बसगाड्यांचा समावेश आहे. या बसगाड्यांमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग बंद असणे, निकषानुसार वाहनांची लांबी, रुंदी नसणे, आपतकालीन दरवाज्याचे ठिकाण बदलणे, वाहनातील गँगवे निकषानुसार नसणे, अग्नीश्यामक यंत्र नसणे, वाहनातील वातानुकूलीत यंत्रणा सुस्थितीत नसणे तथा तक्रार पुस्तिकाही नसणे, वेग नियंत्रक यंत्र बसवलेले नसणे अशा कारणावरून ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून अनुषगीक विषयान्वये ही तपासणी करण्यात येत आहे. प्रकरणी दोन दिवसात मेहकर येथे दोन तर खामगाव येथे जीजे-१४- झेड-३५७० या सुरत ते यवतमाळ या स्लीपर कोच वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महसूल सुरक्षा पथकासमवेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक निशिकांत वैद्य, चालक भिकाजी मेढे आणि मोटार वाहन निरीक्षक भोपळे यांनी केली आहे.
या वाहनांमध्ये आपत्कालीन दरवाजा उघडत नसणे, एक दरवाजा सामानाची कॅबीन बनवून बंद करणे, विना परवाना टपावरून सामानाची वाहतूक करणे तथा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहनात घेणे या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
आॅॅटो रिक्षाही रडारवर
जिल्ह्यात परवानाधारक ५,०७५ अॅटो असून खासगी ९,८५१ अॅटो आहेत. या अॅटो रिक्षांवर ही आरटीओ नजर ठेवून असून येत्या काळात त्यांच्यावरही कारवाई होण्याचे संकेत आहे.
बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता चार लाख ६७ हजार ८३ एकुण वाहने असून दुचाकींचीही संख्या तीन लाख ६७ हजार ८६७ च्या घरात गेली आहे.
फिटनेस प्रमाणपत्र रद्द करणार
परराज्यातून महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाºया या खासगी स्लीपर कोच क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करत असून सुरक्षा मानकांना बगल देत आहे.
सोबतच या वाहनांच्या तंदुरुस्तीचाही प्रश्न गंभीर बनत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वाहनास नऊ हजार रुपये दंड करण्यात आला असून तीन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्रच रद्द करण्यात येणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.
१८ स्लीपर कोचवर नजर
बुलडाणा जिल्ह्यातून १८ स्लीपर कोच बसेसला परवाना देण्यात आलेला आहे. या वाहनावरही आरटीओची नजर असून परराज्यातून महाराष्ट्रात येणाºया व क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी वाहतूक करणाºया खासगी प्रवासी बसेसवरही ही पथके नजर ठेवून आहेत.
या व्यतिरिक्त ‘पाईव्ह प्लस वन’,‘नाईन प्लस वन’,‘सीक्स प्लस वन’ चा परवाना असलेल्या व खासगी वाहतूक करणाºया वाहनावरही सध्या या विभागाने ‘वॉच’ ठेवला आहे. जिल्ह्यात १,७६५ आणि ६५० ऐवढी या काळीपिवळी आणि मॅजिक वाहनांची संख्या आहे. येत्या काळात प्रवाशी सुरक्षेला बगल देणाºया या वाहनावर ही धडक कारवाई करण्यात येणार आहे.