रूईखेड मायंबा प्रकरणाचा मोर्चाद्वारे निषेध!
By admin | Published: June 17, 2017 12:22 AM2017-06-17T00:22:23+5:302017-06-17T00:22:23+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : विविध संघटनांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : रुईखेड मायंबा येथील चर्मकार समाजातील दलित महिलेला मारहाण करून तिची नग्न धिंड काढल्याच्या निषेधार्थ बुलडाणा शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुढाकाराने चर्मकार ऐक्य परिषदेच्या व इतर समविचारी संघटनेच्या सहकार्याने हजारोंचा मोर्चा १६ जून रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
यावेळी मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री नितीन राऊत, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बाबूराव माने, माजी आमदार राणा दिलीप सानंदा, चंद्रप्रकाश देगलूरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष मीरा शिंदे, भानुदास विसावे, लक्ष्मण घुमरे, भाई अशांत वानखडे, राज्याध्यक्ष माधव गायकवाड, सरोज बिसुरे, उमाकांत डोईफोडे यांच्यासह राज्यभरातील विविध मान्यवर उपस्थित होते. मोर्चापूर्वी गांधी भवन येथे भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांनी महिलेस न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याचे सुतोवाच करून चर्मकार ऐक्य हेच माझे स्वप्न आहे. व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे. हेच ऐक्य अखंड टिकवा, असे आवाहन त्यांनी केले. सरकारचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले. माजी मंत्री नितीन राऊत यांनी देशात भाजप सरकार आल्यापासून अन्याय, अत्याचार वाढल्याचे सांगितले. माजी आमदार बाबूराव माने यांनी चर्मकार ऐक्याचे स्वागत करून हे ऐक्य भविष्यात टिकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. लक्ष्मणराव घुमरे यांनी घटनेचा निषेध करून सर्वांनी एकत्र येऊन अशा घटनांचा विरोध करण्याचे आवाहन केले. दामोधर बिडवे यांनी बारा बलुतेदार महासंघातर्फे मोर्चाला जाहीर पाठिंबा देऊन अन्यायग्रस्त महिलेस न्याय देण्याची मागणी केली. समतेचे निळे वादळाचे भाई अशांत वानखडे यांनी सर्व बहुजनांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे सांगून आपली संघटना अशा घटनांचा निषेध करून न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहील याची ग्वाही दिली. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी समाजाच्या ऐक्याचे कौतुक करून सदर महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी समाजाने संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. भाई सुगदाने यांनी हा लढा केवळ चर्मकारांचा नाही तर सर्वांचा असल्याचे नमूद करून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे आवाहन केले. भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा संयोजक कुणाल पैठणकर यांनी झालेल्या अन्यायाची समीक्षा करताना बहुजन समाजातील ऐक्याचा अभाव हेच आमच्यावरील अन्यायाचे कारण आहे, यावर उपाय बहुजनांचे ऐक्याची वज्रमूठ बांधणे हाच आहे, असे सांगितले. मीरा शिंदे यांनी महिलांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठावे व प्रतिकार करण्याचे आवाहन केले. अशोक कानडे, संजय खामकर यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. चंद्रप्रकाश देगलूरकरांनी चर्मकार समाजाला फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार स्वीकारण्याचे आवाहन करून या घटनेचा निषेध केला. यावेळी संपूर्ण राज्यामधून चर्मकार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात मोर्चाचे मुख्य संयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानदेव काटकर यांनी घटनेची संपूर्ण माहिती कथन करून बुलडाणा जिल्हा जिजाऊंचे माहेरघर असताना या घटनेने संपूर्ण मानवजातीला कलंकित केल्याचा निषेध केला.