ग्रामविकास अधिकारी पवार निलंबित
By admin | Published: April 4, 2017 12:34 AM2017-04-04T00:34:00+5:302017-04-04T00:34:00+5:30
खरेदी खताविना केली जागेची नोंद
मेहकर : सध्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत बऱ्याच ठिकाणी अनागोंदी कारभार सुरू असून, यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांना त्रास होत आहे. दरम्यान, अंजनी बु. येथील ग्रामविस्तार अधिकाऱ्याने जागेचे खरेदी खत नसताना नोंदी करून घेतल्याने संबंधितांच्या तक्रारीवरून ग्रामविस्तार अधिकारी आर.जी. पवार यांना मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाणा यांनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.
समाधान जानकीराम पद्मने व गजानन जानकीराम पद्मने रा. अंजनी बु. यांची अंजनी बु. येथे सामूहिक जागा आहे. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी आर.जी. पवार यांनी खरेदी खताशिवाय गजानन पद्मने यांचे नावाने जागेची नोंद करून घेतली होती. तसेच नमुना ८ मध्ये जागेच्या चतुर्सीमेमध्ये नियमबाह्य फेरबदल केला होता. यासंदर्भात समाधान जानकीराम पद्मने यांनी पं.स. गटविकास अधिकारी मेहकर तथा मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाणा यांच्याकडे रीतसर तक्रार करून न्यायाची मागणी केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन विस्तार अधिकारी शरद जाधव यांनी चौकशी केली असता ग्रामविकास अधिकारी आर.जी. पवार हे आपल्या कर्तव्यात कसूर करणे व जागेची नियमबाह्य नोंद करणे, असे चौकशीत आढळून आले. त्यानुसार चौकशी अधिकारी शरद जाधव यांनी अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविला होता. दरम्यान, चौकशी अहवालावरून ग्रामविकास अधिकारी आर.जी. पवार हे दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.