तरुणाकडून ग्रामीण रुग्णालयाची साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:33+5:302021-05-21T04:36:33+5:30

कोरोना महामारीचे संकट घराघरांपर्यंत पोहोचले आहे. या आजारावर काही डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. सर्वसामान्य, गोरगरीब व्यक्तींना हा ...

Rural hospital cleaning by youth | तरुणाकडून ग्रामीण रुग्णालयाची साफसफाई

तरुणाकडून ग्रामीण रुग्णालयाची साफसफाई

Next

कोरोना महामारीचे संकट घराघरांपर्यंत पोहोचले आहे. या आजारावर काही डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. सर्वसामान्य, गोरगरीब व्यक्तींना हा खर्च झेपावणारा नसतो, म्हणून त्यांची पावले शासकीय रुग्णालयांकडे वळतात. शासकीय रुग्णालयाची व्यवस्था व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्चित चांगले आहे. परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून विवेकानंद नगर येथील तरुणाई समोर येऊन महामारीच्या या संकटात अनेक आदर्श उपक्रम राबवीत आहेत. विवेकानंद नगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होत असल्याने रुग्णालयाच्या साफसफाईसाठी तरुणाई सरसावली आहे. लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे, यासाठी प्रशासनाकडूनसुद्धा हालचाली सुरू आहेत. येथील शासकीय कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, गुरुवारी तहसीलदार डाॅ. संजय गरकल, तहसीलदार डॉ. ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, डॉ. धांडे, डॉ. भूषण पागोरे, डॉ. धाडकर, नवीन नर्स, आदी कर्मचारी उपस्थित होते. सध्या २० बेडची व्यवस्था झालेली आहे. बाहेर रुग्ण तपासणीसुद्धा याठिकाणी करण्यात येईल. गुरुवारी २५ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाले आहेत. त्यांची दोन दिवसांत ट्रायल होऊन ते लगेच कार्यान्वित होतील.

रुग्णांसोबतच नातेवाइकांची व्यवस्था

या ठिकाणी रुग्णास व सोबत असलेल्या नातेवाइकास जेवण, सकाळचा नाष्टा, चहा व दोन वेळचे जेवण जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर देणार आहेत. रुग्णांना या ठिकाणाहून इतरत्र हलविण्याचे काम पडल्यास जनसेवा हीच ईश्वर सेवा ही टीम विनामूल्य दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे काम या ठिकाणी करणार आहे. त्यासाठी गाड्या उपलब्ध राहणार आहेत. याठिकाणी सर्व औषधीसुद्धा उपलब्ध राहणार आहे.

येथील ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यामुळे सर्व तपासणी, लसीकरण व औषधोपचार या सर्व समस्यांतून नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबेल. कोरोना महामारीत हे रुग्णालय लवकर सुरू व्हावे, याकरिता सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

संजय वडतकर, जिल्हा परिषद सदस्य.

Web Title: Rural hospital cleaning by youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.