हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालय बनले शाेभेची वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:36+5:302021-04-13T04:32:36+5:30
ओमप्रकाश देवकर लोकमत न्यूज नेटवर्क हिवरा आश्रम : जिल्हाभरात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना बेड मिळत ...
ओमप्रकाश देवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : जिल्हाभरात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालय शाेभेची वास्तू ठरत आहे. या रुग्णालयात काेविड सेंटर सुरू करण्यासाठी तयारीही पूर्ण झाली आहे. केवळ दिरंगाईमुळे अजूनही हे सेंटर सुरू झालेले नाही.
प. पू. शुकदास महाराज यांनी हिवरा आश्रम येथे ग्रामीण रूग्णालय सुरू होण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा केला. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रूग्णालयासाठी शुकदास महाराजांनी पाच एकर जमीन शासनाला दान केली व शासनाने विशेष बाब म्हणून हिवरा आश्रम येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर केले. आता या ग्रामीण रूग्णालयाचे काम पूर्ण झाले असून, कोरोना काळात तरी हे ग्रामीण रूग्णालय सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. सध्या हिवरा आश्रम परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने हे रुग्णालय तत्काळ सुरु करावे जेणेकरुन रुग्णांची होणारी हेळसांड थांबेल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांनी पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे रविवारी केली आहे. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रूग्णालय सुरू झाल्यास जवळपासच्या ४० ते ५० गावांमधील ग्रामस्थांना आरोग्याच्या सेवा सहज उपलब्ध होतील. विवेकानंद आश्रम या सेवाभावी संस्थेच्या कल्याणकारी योजनांमुळे, हजारो विद्यार्थ्यांच्या संपर्कामुळे व याठिकाणी होणाऱ्या विवेकानंद जयंती महोत्सवामुळे या गावची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. सध्या कोरोनाचा आलेख चढता असल्यामुळे जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिवरा आश्रम येथे शासनाचे ग्रामीण रुग्णालय बांधून गेल्या अनेक दिवसांपासून तयार आहे. या परिसरासाठी संजीवनी ठरणारे हे रुग्णालय प. पू. शुकदास महाराजांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होते. शासनाच्या आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून हिवरा आश्रम येथे हे ग्रामीण रूग्णालय मंजूर केले आहे. शासनाचा व संस्थेचा हेतू हा अत्यंत स्तुत्य व वाखाणण्यायोग्य आहे. परंतु, लालफितीत अडकल्यामुळे जनसेवेसाठी हे रूग्णालय अजूनपर्यंत सुरू झालेले नाही. गतवर्षी कोरोनाच्या काळात हिच परिस्थिती निर्माण झाली असताना संस्थेने स्वत: कोविड रुग्णांसाठी १०० खाटांची व्यवस्था केली होती.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
कोरोना काळात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यभर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांची प्रशंसा होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेसुध्दा उल्लेखनीय काम महाराष्ट्र सरकारमध्ये ठळकपणे दिसत आहे. परंतु, हिवरा आश्रम परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यासाठी या दोघांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जनतेच्या आरोग्याची शासनाला काळजी आहे. हे ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू होईल व महाराजांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. सरकारला विनंती करण्यापलिकडे आमच्या हातात काही नाही.
संतोष गोरे, सचिव, विवेकानंद आश्रम