भरधाव ऑटो दुभाजकावर आदळून उलटला, ९ शेतमजूर जखमी
By सदानंद सिरसाट | Published: October 16, 2022 02:31 PM2022-10-16T14:31:16+5:302022-10-16T14:31:33+5:30
शेतमजुरांना घेऊन जाणारा भरघाव मालवाहतुकीचा ऑटो रस्ता दुभाजकावर आदळून झाला अपघात
मलकापूर : शेतमजुरांना घेऊन जाणारा भरघाव मालवाहतुकीचा ऑटो रस्ता दुभाजकावर आदळून उलटल्याने ९ शेतमजूर जखमी झाले. मलकापूर-बुलडाणा रस्त्यावर विघ्नहर्ता रुग्णालयासमोर रविवारी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मालवाहतुकीचा ऑटो क्रमांक एमएच-२८, एबी-४९५८ या वाहनातून तालुक्यातील मौजे कुंड खुर्द येथील शेतमजुरांना रविवारी सकाळी घेऊन जात होता. समोर मिनी ट्रक होता. त्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ऑटो बुलडाणा रस्त्यावरील विघ्नहर्ता रुग्णालयासमोर दुभाजकावर आदळला आणि उलटला. या अपघात घडताना शेतमजुरांना बाहेर पडण्यास संधी मिळाली नाही.
त्यामध्ये नंदिनी अमोल वानखेडे (१४), अनुष्का सीताराम भोलवनकर (१५), वैष्णवी सीताराम भोलवनकर (१७), निर्मला सुभाष भोलवनकर (४८), अभय अमोल वानखेडे (१६), संध्या विजय झनके (३२), प्रमिला सुखदेव भोलवनकर (६५), मुक्ताबाई गजानन निशाणकर (२४), सिंधूबाई केशव भोलवनकर (६०), सर्वच रा.कुंड खुर्द, ता. मलकापूर, असे ९ शेतमजूर जखमी झाले.
नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. जखमींपैकी निर्मला सुभाष भोलवनकर व सिंधूबाई केशव भोलवनकर या दोघींना त्यांची तब्येत खालावल्याने पुढील उपचारार्थ हलवण्यात आले आहे.