आईचे छत्र हरवलेल्या ऋतुजाला मिळाला मायेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:30 AM2018-02-10T00:30:09+5:302018-02-10T00:30:45+5:30
चिखली: तालुक्यातील पेठ येथील मायेचे छत्र हरविलेल्या एका नऊ वर्षीय चिमुरडीला आधार देण्याचे काम चेके पाटील फाउंडेशनने केले आहे. आईचे छत्र हरविलेल्या या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारून तिच्या पुढील आयुष्याची शैक्षणिक व आरोग्यविषयक जबाबदारी फाउंडेशनच्या संचालिका अर्चना चेके पाटील पार पडणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: तालुक्यातील पेठ येथील मायेचे छत्र हरविलेल्या एका नऊ वर्षीय चिमुरडीला आधार देण्याचे काम चेके पाटील फाउंडेशनने केले आहे. आईचे छत्र हरविलेल्या या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारून तिच्या पुढील आयुष्याची शैक्षणिक व आरोग्यविषयक जबाबदारी फाउंडेशनच्या संचालिका अर्चना चेके पाटील पार पडणार आहेत.
जेमतेम २६ वष्रे वय असलेल्या तालुक्यातील पेठ येथील रूपाली रमेश डुकरे यांचे काही दिवसांपूर्वी सर्पदंशाने निधन झाले. त्यांचे पती रमेश डुकरे हे आजारी असल्याने कुटुंबाचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर होता. अत्यंत हालाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी ही जबाबदारी सर्मथपणे पेलली होती. नऊ वर्षांची ऋतुजा व १३ वर्षांच्या युवराज या दोन चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबाची गुजरान मोलमजुरीवर अवलंबून होती. मुलांना चांगले शिक्षण द्यायचे, त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवायचे, हे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या रूपाली डुकरे सर्व अडचणी, संकटांवर मात करीत होत्या; परंतु नियतीने घाला घातला. चार महिन्यांपूर्वी रूपाली यांना सर्पदंश झाला. त्यामुळे त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केल्या गेले. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याने लहानग्या ऋतुजा व युवराजचे मायेचे छत्र हरवले. ही बाब चेके पाटील फाउंडेशनच्या संचालिका अर्चना संजय चेके पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी या चिमुकल्यांना मायेचा आधार देण्यासाठी पुढाकार घेतला.
यानुषंगाने पेठच्या सरपंच सुलोचना शेळके यांच्याशी संपर्क साधून या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचे सांगितले. त्यानुसार अर्चना चेके पाटील यांनी पेठ येथे जाऊन या ऋतुजाची भेट घेऊन तिचे पालकत्व स्वीकारले. यावेळी सरपंच सुलोचना शेळके, द्वारकाबाई शेळके, संगीता शेळके, कमल शेळके, अलका टेंगसे, लक्ष्मी शेळके, मालता शेळके, कांता शेळके, उषा झाल्टे, आशा शेळके, स्त्रीशक्ती ग्रुपच्या मंगला सवडतकर, सारीका खबुतरे, मीना शिंदे, ऊर्मिला बावस्कर, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक इंगळे, पाटील, मेहेंद्रे, वानखेडे यांची उपस्थिती होती.