साखरखेर्डा : प्रल्हाद महाराजांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:12 AM2018-02-17T01:12:04+5:302018-02-17T01:12:16+5:30
साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज (रामदासी) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची सांगता १६ फेब्रुवारीला रथोत्सव मिरवणुकीने झाली. हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज (रामदासी) यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाची सांगता १६ फेब्रुवारीला रथोत्सव मिरवणुकीने झाली. हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला.
रामदासपंत आचार्य यांचे कीर्तन झाल्यानंतर रथोत्सवास प्रारंभ झाला. मिरवणुकीत अश्व, मेहकर येथील झांज पथक, बँड पथक, भव्य रथ रथामध्ये रामानंद स्वामी, प्रल्हाद महाराज रुढ झाले होते. जाफ्राबाद, किनगाव जट्ट, वेणी, साखरखेर्डा येथील संत सावता माळी भजनी मंडळ, महिला मंडळांनी भाग घेतला होता. पालखी रस्त्यावर सडामार्जन करुन रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. सकाळी १0 वाजता प्रल्हाद महाराज यांच्या मंदिरातून रथोत्सवाला प्रारंभ झाला. गुजरी चौक, राम मंदिर, माळीपुरा, बुंधेलपुरा, बसस्थानक, मेन रोड, श्री पलसिद्ध मठ ते गावातून पालखी रस्त्याने दुपारी ४ वाजता मंदिरात रथोत्सवाचा समारोप झाला. टाळकरी, दिंड्यांनी रामनाम घेत प्रल्हाद महाराजांचा जयघोष करीत मिरवणुकीत भक्तीभाव उमटून आला. प्रत्येक ठिकाणी फुले उधळण्यात आली. दुपारी १ वाजता पासून श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सवानिमित्त श्री पलसिद्ध मठात महाप्रसादाला प्रारंभ झाला. महाप्रसाद वितरण व्यवस्था उत्सव समितीचे अध्यक्ष, सदस्य, संस्थानचे विश्वस्त, सेवेकरी यांनी चोख बजविली. अनेक सेवेकरी मंडळींनी आणि ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. दुपारी १ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत महाप्रसाद वितरीत करण्यात आला.
महोत्सवाचे १८0 गावात थेट प्रक्षेपण
९ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था सरपंच महेंद्र पाटील यांनी साखरखेर्डा केबल नेटवर्कवरुन करुन दिली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील १८0 गावात घराघरात या महोत्सवाचा आनंद भाविकांना घेता आला.
कीर्तन, प्रवचन, भावगीतांची रेलचेल
दहाही दिवस प्रकाश महाराज गोंदीकर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, अवंतिका टोळे, पुरुषोत्तम कुळकर्णी यांनी कीर्तन सेवा सर्मपित केली. तर सुनील चिंचोलकर, रामदासपंत आचार्य, मंदा गंधे यांनी प्रवचन सेवा सर्मपित केली. भक्तीगीत, भावगीत बापू देशपांडे, डॉ.कमलाताई भेंडे, भारुडकार, सईताई मोरे, मुग्धा तापस, गीत रामायण श्रीधर फडके, अभंगवाणी अजित कडकडे यांनी सादर केली.