दमदार पावसामुळे बहरली ‘सफेद मुसळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 04:40 PM2019-08-19T16:40:32+5:302019-08-19T16:40:43+5:30

आतापर्यंत झालेला पाऊस ‘सफेद मुसळी’ साठी वरदान ठरत असून यामुळे मुसळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Safed musali flourish due to Heavy rain | दमदार पावसामुळे बहरली ‘सफेद मुसळी’

दमदार पावसामुळे बहरली ‘सफेद मुसळी’

Next

- देवेंद्र ठाकरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात अनेक शेतकरी सफेद मुसळीचे उत्पादन घेतात. परंतु गत ३ वर्षांत पाऊस अत्यल्प पडल्याने मुसळी उत्पादनात घट आली होती. अशा अवस्थेत यावर्षी मात्र चांगला पाऊस पडत आहे. आतापर्यंत झालेला पाऊस ‘सफेद मुसळी’ साठी वरदान ठरत असून यामुळे मुसळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष करून सातपुडा परिसरात हे प्रमाण वाढले आहे. वनौषधींच्या उत्पादनाचे प्रयोग शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकरी डोंगराळ भागात पांढºया मुसळीची शेती करीत आहेत. हा प्रयोग वनौषधी उत्पादनातून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठीही महत्वपूर्ण ठरत आहे.
अनेकांनी पारंपरिक पिकांना फाटा देत वनौषधी हा उत्तम पर्याय शोधला आहे. बुलडाणा जिल्ह्यात सातपुडा परिसरात जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून वनौषधी उत्पादनाकडे वळले आहेत. यावर्षीचा पाऊस सफेद मुसळीसाठी फायदेशिर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. असे असले तरी शासनानेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.


आरोग्यासाठी महत्वपूर्ण वनौषधी!
मुसळी ही आयुर्वेदात आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण वनऔषधी मानली जाते. त्याला परदेशात चांगली मागणी आहे. तथापि, मुसळीच्या अधिक उत्पादनासाठी शेती हाच पर्याय आहे. काही आदिवासी शेतकरी आंतरपीक म्हणूनही मुसळीची लागवड करतात. यावर्षी आपल्याकडे मुसळीसाठी पोषक पाऊस झाल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अनिल गाभणे, फळबाग लागवड तज्ञ शशांक दाते यांनी सांगितले.


अनुदानाअभावी शेतकरी अडचणीत!
मुसळीसाठी उत्पादन खर्च मोठा येतो. साधारणपणे एकरी २ लाख रूपये खर्च येतो. निसर्गाने साथ दिली, तरच चांगले उत्पादन होते. गत ५ वर्षांपासून शासनाकडून अनुदानही मिळाले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आल्याचेही दिसून येत आहे.

आपल्या जिल्ह्यात जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात मुसळीचे उत्पादन घेतल्या जाते. जिल्ह्यात सुमारे २०० हेक्टरवर मुसळीची लागवड झाल्याची माहिती आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने परिस्थिती चांगली आहे.
- नरेंद्र नाईक
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

सफेद मुसळी हे अनिश्चित स्वरूपाचे पिक आहे. चांगले पिक झाल्यास एकरी ५ लाख रूपयांचे उत्पन्न होते. अन्यथा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शासनाने मुसळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान तसेच बाजारपेठेत माल पोहचविण्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे.
- मंगेश धुर्डे
शेतकरी, सुनगाव ता. जळगाव

Web Title: Safed musali flourish due to Heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.