धन्य आजी दिन संत दर्शनाचा; ‘श्रीं’च्या पालखीचे खामगावात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:23 PM2018-08-16T17:23:14+5:302018-08-16T17:25:23+5:30
श्रींच्या दर्शनासाठी भर पावसातही भाविकांची गर्दी
खामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरूवारी सकाळी ८.५५ वाजता खामगावात आगमन झाले. यावेळी खामगाव येथील भाविकांनी श्रींच्या चरणी भक्तीभावानं अभिषेक केला.
आषाढी एकादशीला कैवल्य साम्राज्याचे स्वामी भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘श्रीं’ची पालखी शेगाव येथून पंढरपूरला रवाना झाली होती. आता श्रींची पालखी परतीच्या मार्गावर असून, गुरूवारी सकाळी खामगावात आगमन झाले. हनुमान विटामीन येथे पालखीचा पहिला मुक्काम झाला. याठिकाणी वारकऱ्यांना चहा आणि जेवण देण्यात आले. काही वेळ विश्रांतीनंतर ‘श्रीं’ची पालखी बाळापूर फैलमार्गे शहरात मार्गस्थ झाली. वाटेत ठिकठिकाणी श्रींच्या पालखीचे भाविकांनी मनोभावे स्वागत केले. एक दिवसाच्या मुक्कामात भाविकांनी माऊलींचा श्रद्धेने पाहुणचार केला. शहरातील विविध सामाजिक संस्था, धार्मिक संस्थान, राजकीय पदाधिकारी आणि सेवाभावी भाविकांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि फराळाची व्यवस्था केली होती. आवार येथील मुक्कामानंतर गुरूवारी सकाळी ही पालखी खामगावकडे मार्गस्थ झाली. त्यावेळी सुरूवातीला टेंभुर्णा फाट्यावर आणि त्यानंतर बायपास चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी!
श्रींच्या दर्शनासाठी शहर आणि परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली होती. भर पावसातही भाविकांमध्ये श्रींच्या दर्शनाची ओढ दिसून आली. श्रींच्या पालखीचे आगमन होणार असल्याने, अनेक भाविक सकाळीच टेंभूर्णा फाट्यावर पोहोचले होते.
पोलिसही झाले वारकरी!
श्रींच्या पालखीच्या अनुषंगाने चोख पोलिस बंदोबस्तासाठी खामगाव येथील पोलीस पहाटेच टेंभूर्णा येथे पोहोचले होते. उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख, पीएसआय रविंद्र लांडे, वाहतूक शाखेचे अरविंद राऊत यांच्यासह पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. यावेळी टेंभूर्णा येथून सर्व पोलिस ताफा खामगावपर्यंत पायी पोहोचला.