संत सोपान काका दिंडीला ७८ वर्षांनंतर खंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:48+5:302021-07-19T04:22:48+5:30
साखरखेर्डा : मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील गुंज या छोट्याशा गावातून ७८ वर्षांपासून तीर्थक्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा यावर्षी कोरोना संसर्गामुळे खंडित ...
साखरखेर्डा : मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील गुंज या छोट्याशा गावातून ७८ वर्षांपासून तीर्थक्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा यावर्षी कोरोना संसर्गामुळे खंडित झाली आहे. सोपान काका यांचे शिष्य माणिकराव ढवळे यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून ही परंपरा सुरू केली होती. त्यांच्या दिंडीला सोपानकाका पालखी सोहळ्यात सर्वप्रथम मानाचे स्थान आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंज या छोट्याशा गावात माणिकराव गोविंदराव ढवळे यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासून हरिनामात तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भक्तीचा छंद त्यांना लागला. शेती, प्रपंच याकडे फारसे लक्ष दिले नाही. ते वयाच्या १२ व्या वर्षी पंढरपुरात जाऊन स्थायिक झाले. चार वर्षे तेथे पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन सेवा केली. वयाच्या सोळाव्या वर्षी गुंज येथून पायी दिंडी प्रवास सुरू केला. डोक्यावर ओझे घेऊन अनवाणी पायाने चालत, मुखातून हरिनामाचा गजर करीत २५ ते ३० वारकऱ्यांना सोबत घेऊन दरकोस दर मुक्काम करीत यांची दिंडी १९४२ मध्ये संत सोपान काका यांच्या दिंडीत सामील झाली. १९४२ ते २०११ पर्यंत म्हणजे ६९ वर्षे माणिकराव गोविंदराव ढवळे यांनी सोपान काकाची दिंडी म्हणून गुंज ते पंढरपूर असा अखंड वारी सोहळा केला. २५ जुलै २०११ ला त्यांनी पंढरपूर वारीतून परत येत असताना आपला देह ठेवला. ही परंपरा खंडित राहू नये, म्हणून त्यांची मुलगी भागिरथाबाई यांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार करीत वडिलांच्या पश्चात वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन पंढरपूर वारी सोहळा अखंडपणे सुरू ठेवला.
आई-वडिलांसोबत भागिरथीबाई यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून दिंडी प्रवास सुरू केला होता. त्यामुळे त्या सर्वांच्या परिचित आणि धार्मिक वृत्तीच्या असल्याने हा मान त्यांना मिळाला. गेल्या ८ वर्षांपासून या पायी वारीचे नेतृत्व त्या अविरत करीत आहेत.
दिंडीला पहिला मान
गुंज येथून पैठण, निळोबाराय, पिंपळनेर, देहू, आळंदी, पुणे, असा वारी दिंडी सोहळा सासवडला पोहचल्यानंतर सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यात पहिला मान यांचा आहे. आजपर्यंत हा दिंडी सोहळा अविरत सुरू असून, यावर्षी ७९ वर्षे पूर्ण होणार होते; परंतु सलग दुसऱ्या वर्षीही त्यांचा दिंडी सोहळा रद्द झाल्याने उत्सवापासून वंचित राहावे लागत आहे; पण काेविड १९ मुळे परवानगी नसल्याने आषाढी एकादशीला पंढरपूरला न जाता घरीच गुंज गावात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा करणार आहे.
आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी प्रवास करताना माणिकराव ढवळे यांना दुष्काळाचे अनेक चटके सहन करावे लागले. तरीही त्या संकटांना सामोरे जात त्यांनी सोपान काका पालखी सोहळ्यात आपली वारकरी दिंडी मानाची दिंडी म्हणून प्रथम स्थान कायम राखले. ती परंपरा मी अविरत चालू ठेवणार आहे.
भागिरथाबाई माणिकराव ढवळे.