नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांनी गंडविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:56 PM2017-08-26T22:56:54+5:302017-08-26T22:56:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बँकेत नोकरी लावून देतो, असे म्हणून येथील हनुमान नगरातील इसमाकडून दोघांनी चार लाख रुपये घेऊन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत विनायक भारंबे (वय २६) रा.हनुमान नगर आयटीआय शाळेजवळ यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की घारोड येथील रहिवासी गजानन विठ्ठल इंगोले यांनी ११ आॅक्टोबर २०१५ रोजी मला भेटून तुला व तुझ्या भावाला नोकरीवर लावून देतो. माझा भाचा प्रशांत दिनकर जवंजाळ याने बºयाच मुलांना नोकरीवर लावले आहे, असे म्हणून विश्वास संपादन केला व वेगवेगळ्या तारखेला माझे वडील विनायक भारंबे यांनी त्यांना पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक बुलडाणा शाखेच्या धनादेशाद्वारे चार लाख रुपये दिले. उपरोक्त दोघांनी पैसे घेऊन युनायटेड बँकेमध्ये नोकरी लागल्याचे पत्र दिले; परंतु नियुक्तिपत्राची चौकशी केली असता, ते खोटे असल्याचे समजले. त्यामुळे दोघांना दिलेले पैसे परत देण्यासाठी वारंवार मागणी केली असता टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसे परत देण्यास नकार दिला. या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन विठ्ठल इंगोले रा. घारोड व प्रशांत दिनकर जवंजाळ या दोघांविरुद्ध कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.