‘एन ९५’च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:58 AM2020-09-27T11:58:13+5:302020-09-27T11:58:35+5:30
साध्या मास्कवरही ‘एन ९५’ नावाचा शिक्का मारून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ‘एन ९५’ मास्क घेण्याकडे सर्वांचा कल आहे. या संधीचा फायदा काही विक्रेत्यांनी ‘एन ९५’च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री सुरू केली आहे. दुकान बदलले की मास्कचे भावही बदलतात; त्यातही आपण खरेदी केलेला मास्क हा ‘एन ९५’ आहे का, याची शाश्वती अन्न व औषध प्रशासन तथा ग्राहक संरक्षण विभागाही देऊ शकत नसल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणू संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाकडूनही कारवाईचे सत्र सुरू आहे. प्रत्येकजण मेडीकलमध्ये गेल्यानंतर ‘एन ९५’ मास्कची मागणी करतात. ‘एन ९५’ मास्कच्या वाढत्या मागणीमुळे व्यापाऱ्यांनी व इतर कंपन्यांनी या मास्कचे दर १०० रुपयांवर पोहचविले आहेत. २६ सप्टेंबर रोजी ‘लोकमत’ चमुने बुलडाणा शहरातील काही मेडीकलला व रस्त्यावरील मास्क विक्रीच्या दुकानांना भेट देऊन विक्रीची माहिती घेतली. त्यामध्ये प्रत्येक दुकानामध्ये मास्कचे दर वेगवेगळे दिसून आले. काही साध्या मास्कवरही ‘एन ९५’ नावाचा शिक्का मारून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला. एका ठिकाणी तर कापडी मास्कच्या दरात एन ९५ मास्क मिळत असल्याचे दिसून आले.
काय म्हणतात अधिकारी...
अन्न औषध प्रशासन विभागाशी संपर्क केला असता ‘एन ९५’ मास्क आौषधीमध्ये येत नाही, त्यामुळे त्यासंदर्भात त्यांनाही अधिक माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
मास्क विक्री संदर्भात आपल्याकडे कुठलीच कारवाई झालेली नाही. ते ग्राहक संरक्षण विभागाकडे येत नाही. नियमापेक्षा जादा दराने व्रिकी होत असल्यास त्यावर कारवाई होईल.
-नी. रा. कांबळे, सहाय्यक नियंत्रक, ग्राहक संरक्षण विभाग बुलडाणा.
‘एन ९५’ ओळखायचा कसा?
‘एन ९५’ नावाचा मास्क नेमका ओळखायचा कसा? हाच प्रश्न प्रत्येकाला आहे. याविषयी विक्रेत्यांना विचारले असता त्या मास्कवर ‘एन ९५’ असे लिहिलेले आहे, म्हणून तो ‘एन ९५’ आहे, असे सांगण्यात आले. दुकानावर मास्क खरेदी करणाºया ग्राहकांना विचारणा केली असता, दुकानदाराने दिला म्हणून घेतल्याचे सांगितले. अन्न औषध प्रशासन व ग्राहक संरक्षण विभागालाही याची माहिती नाही.