रासायनिक खतांची विक्री जुन्या दरानेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:45+5:302021-05-27T04:35:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या नसल्या तरीसुद्धा खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे भाव वाढवले. दरम्यान, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या नसल्या तरीसुद्धा खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे भाव वाढवले. दरम्यान, केंद्राने खतांवरील सबसिडी वाढवून किमती कमी केल्या असल्याने जुन्या दरात खते मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कंपनीकडून कोणत्याही सूचना नसल्याने लहान-मोठ्या खत वितरकांना खतांच्या किमती निश्चित सांगता येत नाहीत. त्यामुळे खतांच्या किमतीबाबत असलेला हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हाेती़. यावेळी त्यांनी खते जुन्या दरानेच देण्याचे आश्वासन दिले आहे.
खतांच्या किमती वाढलेल्या नसताना खत कंपन्यांकडून वाढीव दराने खतांची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि यामुळे शेतकऱ्यांसह लहान-मोठ्या खत वितरकांना होत असलेला त्रास पाहता, आमदार श्वेता महाले यांनी २५ मे रोजी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची खते वितरकांसह भेट घेतली. तत्पूर्वी आमदार महालेंनी चिखली शहरातील खत वितरक आणि तालुका कृषी अधिकारी यांची २४ मे रोजी बैठक घेऊन याबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर आमदार महालेंनी वितरकांसह २५ मे राेजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन खतांच्या दराबाबत असलेला संभ्रम दूर करण्याची मागणी केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्याच दरात खते मिळतील, असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला बुलडाणा भाजप तालुकाध्यक्ष अॅड. सुनील देशमुख, उबाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, महेश महाजन, रमेश सिसोदिया, राजेंद्र बाहेकर, पुरूषोत्तम सुरडकर, दीपक बोंद्रे, आशिष बोंद्रे, बाळू देशमुख, पांडुरंग होणे, सोनुने, आदी उपस्थित होते.
खत उत्पादक कंपन्यांवर कारवाई करा
खत वितरकांनी वाढीव दराने अॅडव्हान्स पैसे भरले आहेत. तसेच आता नव्याने खते घेण्याची वितरकांकडून मागणी गेल्यास खतांच्या किमती कमी न करता, वाढीव दरानेच पैसे भरावे लागतील, असे खते उत्पादक कंपन्या सांगत आहेत. त्यामुळे खत उत्पादक कंपन्यांची मनमानी मोडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी आमदार महाले यांनी केली.
बियाण्यासाठी महाडीबीटीला मुदतवाढ द्या !
महाडीबीटी अंतर्गत सोयाबीन बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व ई - सेवा केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज करता आले नाहीत. महाडीबीटी पोर्टलवर सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे होती. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी आमदार महालेंनी यावेळी केली.
कृषी सेवा केंद्रांची वेळ वाढवावी !
खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. पेरणीच्या ऐन हंगामात दुकाने कमी वेळासाठी उघडी राहिल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल आणि कोरोनाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब मान्य करून तसा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.