मेहकर तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री; अधिकार्यांचे दुर्लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:32 PM2017-12-20T23:32:40+5:302017-12-20T23:36:19+5:30
मेहकर : तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गुटखा विक्री राजरोसपणे सरू आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गुटखा विक्री राजरोसपणे सरू आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
गुटखा विक्रीवर शासनाची बंदी असतानाही अधिकार्यांच्या मूकसंमतीने अवैध गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. अधिकार्यांकडून कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने अशा गुटखा विक्रीला मेहकर तालुक्यात परवानगीच मिळाली की काय, असे चित्र पाहावयास मिळत आहेत. गुटखा सेवन केल्याने युवा वर्ग, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस हा गुटख्याच्या आहारी जाताना दिसत आहे. गुटखा विक्री मेहकर शहरासह डोणगाव, जानेफळ, सुलतानपूर, हिवराआश्रम, कळंबेश्वर, लोणीगवळी, घाटबोरी, सोनाटी या मोठय़ा गावासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात गुटखा विक्री सुरू आहे. तसेच मेहकर शहरातील विविध शिक्षण संस्था परिसर, नवीन बस स्थानक, लोणार वेस, इंद्रप्रस्थ चौक, जुने बसस्थानक आदी ठिकाणी गुटखा विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. सदर गुटखा विक्रीला आळा बसावा, अशी मागणी होत आहे.
वर्षभरापासून ठोस कारवाई नाही
गेल्या वर्षभरापासून मेहकर शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्री करणार्यांवर किरकोळ कारवाई वगळता ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मेहकर हे गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र बनले असून, मेहकर तालुक्यासह लोणार व इतर ठिकाणी मेहकरवरुनच गुटखा पुरविल्या जात आहे. गुटख्याच्या या अवैध विक्रीमुळे गैरमार्गाने दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
व्यसनमुक्ती संस्थांनी पुढे येण्याची गरज
मेहकर शहरासह तालुक्यात होत असलेली गुटखा विक्री पाहता युवा वर्ग व्यसनाधीन होत आहे. व्यसनाच्या आहारी जावून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन महिला वर्गाचेसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. व्यसनमुक्तीसाठी विविध संस्था सतत सामाजिक जनजागृती करीत असतात. अशा व्यसनमुक्ती संस्थांनी पुढे येऊन आपल्या परिसरात सुरु असलेला अवैध गुटखा विक्रीला आळा बसावा, यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाद्वारे जिल्ह्यात आतापर्यंत लाखो रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटख्याबाबत माहिती दिल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- गोपाल माहुरे,
अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बुलडाणा
-