पीक विम्यासाठी अशीही शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:52+5:302021-09-22T04:38:52+5:30
बुलडाणा : पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी काही शेतकरी नुकसान झालेल्या दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे फाेटाे काढत असल्याची तक्रार देऊळघाट ...
बुलडाणा : पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी काही शेतकरी नुकसान झालेल्या दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे फाेटाे काढत असल्याची तक्रार देऊळघाट येथील शेतकऱ्याने कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे. विमा कंपनीच्या एजंटला हाताशी धरून काही दलालही सक्रिय झाल्याचे शेतकऱ्याने निवेदनात म्हटले आहे.
बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथील शेतकरी शब्बीर खान उमरखान यांची गट क्रमांक ३३४ मध्ये पैनगंगा नदीला लागूनच शेती आहे. मागील ६-७ सप्टेंबरला पैनगंगा नदीला आलेल्या महापुरात त्यांची शेतीसुद्धा पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतात पिकांचे पूर्ण नुकसान झालेले आहे. त्यांनी पीक विमा काढलेला नसून त्यांच्या शेतात देऊळघाट येथील दाेन शेतकरी पीक विमा कंपनीच्या एजंटाला घेऊन आले व त्यांच्या शेतातील पीकनुकसानीचे फोटो काढून इतरांचे नुकसान दाखवून त्यांना नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी अपलोड केल्याची तक्रार शब्बीर खान यांनी २० सप्टेंबर रोजी केली आहे. ही फसवणूक थांबवण्याची मागणी शेतकऱ्याने निवेदनात केली आहे.