तीच गावे, त्याच उपाययोजना आता दुष्काळी झळा!
By admin | Published: April 4, 2016 02:03 AM2016-04-04T02:03:55+5:302016-04-04T02:03:55+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील ७0 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई असते.
बुलडाणा : 'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे उन्हाळाही नियमित येतो व येताना बुलडाणा जिल्ह्याच्या नशिबी पाणीटंचाईचा शाप घेऊन येतो. या वर्षी तर दुष्काळाचा चटका बसत आहे. गेल्या दहा वर्षांंंचा आढावा घेतला तर पर्जन्यमान कितीही होवो, जिल्ह्यातील ७0 टक्के गावांमध्ये पाणीटंचाई असते व या गावांमध्ये प्रशासनाने उपाययोजना राबविल्या आहेत. टंचाईची गावे तीच, टंचाई निवारण्यासाठी राबविल्या जाणार्या उपाययोजनाही त्याच. खर्च मात्र दरवर्षी वाढताच. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने टंचाईचा खर्च हा जिल्ह्यासाठी पांढरा हत्ती ठरला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ४२७ गावे आहेत. मात्र, या गावांपैकी ६८८ पासून ८८४ गावांमध्ये पाणीटंचाई गेल्या दहा वर्षांंमध्ये राहिलेली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी दरवर्षी बुडकी घेणे, विहीर खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्ण करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना घेणे, हय़ाच उपाययोजना राबविल्या जातात. जिल्ह्यात पाऊस कितीही पडो, टंचाईची गावे मात्र हीच कायम आहेत. बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड, हतेडी, देवपूर, देऊळघाट, पळसखेड नाईक, येळगाव, अटकळ, पाडळी. चिखलीमधील आंधई, पळसखेड सपकाळ. मेहकरमधील हिवरा साबळे, घुटी, जवळा, पार्डी, बारडा, आंध्रुड, नागापूर, नागेशवाडी. खामगावमधील पिंप्राळा, बोरजवळा, कुंबेफळ, नागापूरवाडी, लोखंडा, निपाणा. शेगाव तालुक्यातील जवळा कुरखेड, माटरगाव, काबरखेड. मलकापूर तालुक्यातील दुधलगाव कुंड, बोरखेड, निमखेड, बेलाड, मलकापूर ग्रामीण. मोताळा तालुक्यातील निपाणा, दाभाडी, टाकळी वाघजाळ, जहांगीरपूर, धोलखेड, सारोळा मारोती, नाईकनगर, लपाली, कोल्हीगवळी, नळकुंड, डिडोळा खुर्द. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी, भालेगाव, वडगाव डिघी, वडगाव नवे, सावरगाव, शेंबा, पोफळी, तांदूळवाडी, फुली, टाकरखेड, खैरा, शेंबा खु., खेडी व चांदुरबिस्वा हीच गावे आलटून पालटून टंचाईग्रस्त राहिलेली आहेत. या गावांमध्ये उपाययोजना होतात; मात्र त्या केवळ टंचाईपुरत्याच. कायमस्वरूपी उपाययोजना शासन करणार का? हा प्रश्न मात्र दरवर्षी अनुत्तरीतच राहतो.