समृद्धी महामार्गाच्या कामाने घेतला वेग; ७० टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:29 AM2021-01-01T11:29:23+5:302021-01-01T11:32:25+5:30
Samruddhi Highway : बुलडाणा जिल्ह्यात या मार्गाची लांबी ८७ किमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : विदर्भला थेट मुंबईशी जोडणाऱ्या व राज्यातील दहा जिल्ह्यातून जात असलेल्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचे काम आता वेगाने सुरू झाले असून, मेहकर पट्ट्यात ते ७० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. सिंदखेड राजा पॅकेजअंतर्गत त्याचे काम ४० टक्क्यांच्या आसपास आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच महाराष्ट्र दिनी नागपूर ते शिर्डीपर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाला गती देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात या मार्गाची लांबी ८७ किमी असून, पॅकेज सात आणि सहाअतंर्गत ही कामे सुरू असून, येत्या काळात कामे अधिक वेगाने होतील असे राज्य रस्ते विकास महामार्गच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या रस्त्यासाठी दीड हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असून, जवळपास ८०० कोटींपेक्षा अधिक मोबदला शेतकऱ्यांना दिल्या गेला आहे. अनेक अडथळे दूर करत हा मार्ग सध्या आकार घेत आहे. मधल्या काळात कोरोना तथा अतिवृष्टीमुळे या कामाला काहीसा फटका बसला होता. वाहनांचे टायर घासल्याने कोरोना काळात ९० वाहने तशीच उभी होती.
मिशन बिगीन अगेनअंतर्गतनंतर रस्त्याची कामे झपाट्याने हाती घेण्यात आली होती. एमएसआरडीचे वरिष्ठ अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनीही गेल्या महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्गाच्या कामाचा प्रत्यक्ष स्थळपाहणी करून आढावा घेतला होता. त्यावेळीच त्यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यान ‘लोकतमत’शी बोलताना मे २०२१पर्यंत यामार्गावर वाहतूक सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
रस्त्याची रुंदी ४७ मीटर
समृद्धी महामार्गाच्या धावपट्टीची रुंदी ही ४७ मीटर असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १२० मीटरवर फेन्सिंग राहणार आहे. त्यामुळे थेट रस्त्यात कोणालाही घुसता येणार नाही. दुसरबीड, मेहकर आणि सिंदखेड राजा येथे वाहनांना रस्त्यावर जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी मार्गिका राहणार आहेत. दरम्यान, सावरगाव माळ आणि साबरा, फर्दापूर परिरात या मार्गावर जिल्ह्यात दोन नवनगरे वसविण्यात येणार आहे. त्याचीही प्राथमिकस्तरावरील कामे झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.