समृद्धी’साठी बुलडाणा जिल्ह्यातील रेती घाट राखीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:58 PM2018-05-16T17:58:31+5:302018-05-16T17:58:31+5:30
बुलडाणा : विदर्भाची थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी कनेक्टीव्हीटी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी जिल्ह्यातील ठरावीक रेती घाट राखीव ठेवण्यात येणार आहे
- नीलेश जोशी
बुलडाणा : विदर्भाची थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी कनेक्टीव्हीटी वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गासाठी जिल्ह्यातील ठरावीक रेती घाट राखीव ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातून ८७.२९ किमी अंतराचा हा महामार्ग जात असल्याने या रस्त्याच्या कामासाठी नऊ लाख घनमीटर रेतीची गरज पडणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेला हे पाऊल उचलावे लागत आहे. महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी किमान ९० टक्के जमीनीचे संपादन होणे आवश्यक असता जिल्ह्यात आतापर्यंत ८२ टक्के जमीनच संपादीत केली गेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जिल्ह्यातील कामास कधी सुरुवात होईल याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे हे मुद्दे घेऊन मुख्यमंत्री २१ मे रोजी व्हीसीद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेणार असल्याने प्रशासकीय पातळीवर समृद्धी महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. समृद्धी महामार्ग हा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, सिंदखेड राजा या दोन्ही उपविभागातून गेलेले आहे. या रस्त्याचे काम त्वरेने व्हावे यासाठी डिसेंबर २०१७ मध्येच प्रतीदिन २५ हेक्टर जमीन खरेदीचे उदिष्ठ बुलडाणा जिल्ह्याने ठेवले होते. त्याउपरही मे महिन्याच्या मध्यावर एकुण जमिनीपैकी ८२ टक्के जमीनच महामार्गासाठी संपादीत करण्यात आली आहे. उर्वरित अठरा टक्के जमीनही लवकरच संपादीत करण्यात येत असल्याचे समृद्धी महामार्ग विभागात काम करण्यार्या सुत्रांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी (महामार्ग) जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन जिल्ह्यातील रेती घाट या महामार्गाच्या कामासाठी राखीव ठेवण्याबाबत सांगितले आहे. अद्याप महसूल व भूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील रेती घाटाची पाहणी केलेली नाही. भूजल सर्व्हेक्षण विभाग आणि पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोणते रेती घाट हे रेती उपसा करण्यासाठी उपयुक्त आहे हे स्पष्ट होईल. सोबतच त्यातील कोणते रेती घाट हे समृद्धी महामार्गासाठी राखीव ठेवायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील तीन हजार ८५१ शेतकर्यांची शेत जमीन विशिष्ठ मर्यादेत समृद्धी महामार्गासाठी संपादीत केली जाणार आहे. दीड हजार पेक्षा अधीक शेतकर्यांचे संमतीपत्रही त्यास यापूर्वीच मिळालेले होते. एकूण जवळफास एक हजार २५७ हेक्टर जमीन संपादीत करावयाची असून यातील एक हजार १३६ हेक्टर जमीन ही खासगी आहे.