वन कर्मचाऱ्यांवर रेती माफियांचा हल्ला, तीन जण जखमी; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना
By निलेश जोशी | Published: September 24, 2022 05:30 PM2022-09-24T17:30:13+5:302022-09-24T17:30:31+5:30
येथील ज्ञानगंगा अभयारण्यातील लोखंडा भागातील नदीतून अवैधरित्या रेतीचा उपसा करण्यापासून रोखल्यामुळे रेती माफियांनी वनकर्मचाऱ्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला
बुलढाणा:
येथील ज्ञानगंगा अभयारण्यातील लोखंडा भागातील नदीतून अवैधरित्या रेतीचा उपसा करण्यापासून रोखल्यामुळे रेती माफियांनी वनकर्मचाऱ्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला करून तिघांना गंभीररित्या जखमी केले आहे. दरम्यान रेती माफियांचे जप्त केलेले ट्रॅक्टर व अन्य साहित्यही रेती माफियांनी वनविभागाच्या ताब्यातून पळवून नेले. ही घटना २४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात वनविभागाने तक्रार दिली असून रेती माफियाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ज्ञानगंगा अभयारण्यातील पिंपळगाव नाथ बीटमध्ये दुपारी घडली. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे संरक्षित व प्रतिबंधित क्षेत्र आहे, या ठिकाणी वन्यजीव विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय जाता येत नाही, असे असले तरीही अभयारण्यातून वाहणाऱ्या नदी व नाल्या मधून अवैधरित्या रेती तस्करी केली जाते. दरम्यान वनरक्षक सिद्धेश्वर पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसह खामगाव रेंज मधील पिंपळगाव नाथ बीट मध्ये गस्त घालीत असताना, लोखंडा भागातील नदीतून काही लोक ट्रॅक्टरद्वारे रेतीचा उपसा करीत आहे, अशी माहिती त्यांना मिळाली. त्या आधारावर त्यांनी लोखंडा परिसरातील नदीकाठ गाठला असता काही लोक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात कारवाई केली.
दरम्यान कोथळी येथील ट्रॅक्टर मालक युसुफ डॉन तेथे आला. त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी लाठ्या-काठ्यांनी वन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. त्यामध्ये वनरक्षक सिद्धेश्वर कारभारी पाटील, वनमजुर ज्ञानेश्वर पुंजाजी सोनूने व ज्ञानसिंग मोहनसिंग पडवाल हे तिघे जखमी झाले. त्यांना तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल दाखल करण्यात आले आहे.
जखमींना खासगी रुग्णालयात हलविले
या हल्ल्यात तिघेही वन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाच्या थेट डोक्यातच रेती माफियांनी काठी टाकल्याने त्याची प्रकृती अधिकच गंभीर आहे. त्यामुळे सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारसाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात वनविभागाच्यावतीने तक्रार देण्यात येत असल्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.