खामगाव तालुक्यात रेती तस्करीचा गोरखधंदा जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:46 AM2021-03-13T11:46:39+5:302021-03-13T11:46:49+5:30
Illegal Sand Trafking नदीच्या रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती उत्खनन केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातून वाहणाऱ्या नदीच्या रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती उत्खनन केले जात आहे. झटपट पैसा कमावून श्रीमंत होण्याचा अवैध धंदा सध्या खामगाव तालुक्यात जोमात सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
खामगाव तालुक्यातून वाहणाऱ्या नदीवर असलेल्या गावातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे विविध बांधकामांसाठी रेती चोरून विक्री करण्याचा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी काही व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरी रात्रीच्या सुमारास करुन त्याची विक्री करीत आहेत. परिणामी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यात रेती घाटांची लिलाव प्रक्रिया प्रस्तावित होती. जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीवरील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे तालुक्यात रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे.
नदी घाटावरून सुरू असलेल्या रेती तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. तसेच रेती घाटांचे लिलाव करुन सामान्य जनतेला वाजवी दरात रेती उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
रेती तस्करीत अदृश्य हात?
तालुक्यातील नदीवरील घाटांचे लिलाव न झाल्याने रात्रीच्या सुमारास रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. परंतु या प्रकारात अनेकांचे अदृश्य हात असल्याची चर्चा आहे.