रेती वाहतूकीचा रात्रीस खेळ चाले; रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त, चालक पसार
By ब्रह्मानंद जाधव | Updated: March 3, 2023 19:16 IST2023-03-03T19:15:59+5:302023-03-03T19:16:07+5:30
शिवनी टाका रोड ने ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसिलदार सावंत यांना मिळाली.

रेती वाहतूकीचा रात्रीस खेळ चाले; रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त, चालक पसार
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी रेतीचा अवैध उपसा व रेती सुरू आहे. या परिसरात रेती वाहतूकीचा रात्रीस खेळ चालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंदखेडराजा तहसीलचे सुनील सावंत यांनी रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर गुरूवारी रात्रीदरम्यान जप्त केले. परंतू ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
शिवनी टाका रोड ने ट्रॅक्टरद्वारे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसिलदार सावंत यांना मिळाली. दरम्यान, त्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने शासकीय वाहन न वापरता दुचाकीने ३ मार्चच्या मध्यरात्री २ वाजता रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला. ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. २८ ए. जे. ५२८५) थांबवले असता, ट्रॅक्टरमधील मजूर व ट्रॅक्टर चालकाने अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.
ट्रॅक्टरचे मालक गणेश बंडू मेहेत्रे हे आहेत. त्यानंतर ट्रॅक्टरचा दुसरा चालक बोलावून ते ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. तहसिलदार सुनील सावंत यांच्या या कारवाईमुळे रेतीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परिसरामध्ये रेतीचा अवैध उपसा सुरू असेल, किंवा वाहतूक होत असल्यास माहिती द्यावी, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आवाहन यावेळी तहसिलदार सावंत यांनी केले. यावेळी कारवाई करताना त्यांच्यासोबत कोतवाल आकाश माघाडे, गोपनीय पोलीस कर्मचारी वायाळ व कर्मचारी उपस्थित होते.