रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:39+5:302021-03-13T05:02:39+5:30
मराठवाड्यातील पूर्णा नदीपात्रातील वाळू उपसा सुरू झाल्याने रेतीघाटातून तसेच रेतीघाटाकडे जाणारी वाहतूक संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, ...
मराठवाड्यातील पूर्णा नदीपात्रातील वाळू उपसा सुरू झाल्याने रेतीघाटातून तसेच रेतीघाटाकडे जाणारी वाहतूक संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, आपल्या वाहनाच्या दिवसभरात जास्तीत जास्त फेऱ्या व्हाव्यात, या उद्देशाने हे रेती वाहनचालक निष्काळजीपणे भरधाव वेगाने आपले वाहन चालवित असल्याचे दिसून येत आहे. ११ मार्च रोजी रेती घाटातून भरधाव वेगाने येणारे १० टायर टिप्पर (क्रमांक एम. एच.२८ ए.बी.४८८८) नुकतेच पासिंग झालेले वाहन दुपारी चार वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने येत मंठा नाक्याजवळ असलेल्या वळणावर उलटले. यामधील वाहनचालक व आतमध्ये असलेल्या दोन व्यक्ती काचा फुटून बाहेर पडल्या. या अपघातामध्ये चालक जखमी झाला असून, या टिप्परमध्ये तळणीवरून लोणार येथे येणारा एक प्रवासीसुद्धा जखमी झाला आहे. या टिप्परचा वेग जास्त होता. त्यामुळे टिप्पर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टिप्पर उलटला. मागील महिन्यापासून तो टिप्परचालक बेभानपणे शहरातून रात्रंदिवस रेती वाहतूक करत आहे. यामध्ये महसूल विभागाचा तपासणी नाका आहे. महसूल प्रशासन त्याचे काम चोखपणे बजावत असल्याचे दाखवत आहे. रेतीमाफियांवर व टिप्पर चालकावर कारवाई का करत नाही, हा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. भरधाव वेगाने रेतीवाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असतानासुद्धा प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष निर्माण होत आहे.
मराठवाड्यातून येते रेती
सध्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातून रेतीची वाहतूक सुरू आहे. परंतु, रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रेतीची वाहतूक करणारे रेती झाकून टाकत नसल्याने त्याचे कण हवेत उडतात. हे रेतीचे कण मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांत जाऊन अपघात घडल्याच्या घटना यापूर्वी या रस्त्यावर झालेल्या आहेत.