उत्खननास बंदी असतानाही रेतीची वाहने रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 08:01 PM2020-09-05T20:01:32+5:302020-09-05T20:01:46+5:30
रेती माफियांशी अर्थपूर्ण व्यवहारातून अनेक कारवाया दाबल्या जात असल्याची चर्चा आहे.
- निल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यातील २५ रेती घाट वगळता उर्वरीत रेती घाटातून रेतीचे उत्खनन आणि वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, महसूल अधिकाºयांच्या कृपादृष्टीमुळे खामगाव आणि परिसरात रेतीची सर्रास अवैध तस्करी सुरू आहे. रेतीची वाहतूक आणि विक्री करणारी वाहने सर्रास रस्त्यावर फिरत असताना आढळून येतात. मात्र, रेती माफियांशी अर्थपूर्ण व्यवहारातून अनेक कारवाया दाबल्या जात असल्याची चर्चा आहे. शेगाव तालुक्यातील डोंगरखेड ए,बी, भेंडवळ बुदू्रक, खातखेड, कालवड, सगोडा, पाडसुळ, झाडेगाव, पाळोदी येथे मन नदी पात्र, संग्रामपूर तालुक्यातील भोन, भोनगाव, खिरोडा, दादुलगाव, जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक, खूर्द, माहुली एबी, या ठिकाणाहूनच रेती उत्खनन करणे शक्य आहे. मात्र, तरी देखील खामगाव शहरात जलंब-माटरगाव, नांदुरा, पिंपळगाव राजा, शेगाव, काळेगाव शिवारात मोठ्याप्रमाणात नदी आणि नाल्याच्या पात्रात रेतीचे उत्खनन करण्यात येत आहे. रात्रीची संचारबंदी झुगारून रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मात्र, याकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ही वाहतूक रोखण्यासाठी तहसील विभागातून विशेष पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे. परंतु हे पथक रात्री १२ नंतर बंद होत असल्याने सर्रासपणे अवैधरित्याच्या गाड्या सुसाट वेगाने खामगावच्या रस्त्यावर धावताना दिसून येत आहे. प्रत्येकी सहा हजार रुपये ट्रीप असा रेतीचा दर असून दररोज शंभर ते सव्वाशे गाड्या रेती खामगाव शहर व परिसरात पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरात मोठ- मोठी बांधकामे सुरू आहे तर अवैध वाळूचा व्यवसाय करणारे नागरिकही रेती पोचविण्याचे काम भल्या पहाटे तीनच्या नंतरच करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंदी काळातही शहरात रेतीची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. काही ठिकाणी नदीपात्रातील तर काही ठिकाणी नाल्याची रेती उत्खनन करण्याचे काम जोरात सुरू आहे. रेतीच्या चोरट्या वाहतुकीतून रेतीची लक्षावधी रुपयांची उलाढाल सुरू असल्याचेही समोर येत आहे. यासंदर्भात महसूल अधिकाºयांशी संपर्क साधला असता दोन गाड्या पकडल्याचे सांगत, त्यांनी पुढील माहिती देण्याचे टाळले.