मंगरूळ नवघरे येथील जवान संदीप गोजरे यांचे कर्तव्यावर असताना निधन
By संदीप वानखेडे | Published: April 15, 2024 07:33 PM2024-04-15T19:33:30+5:302024-04-15T19:33:52+5:30
कर्तव्यावर असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
चिखली : तालुक्यातील मंगरुळ नवघरे येथील जवान संदीप गोजरे यांना १४ एप्रिल रोजी राजस्थानमध्ये वीरमरण आले आहे. शहीद जवान संदीप गोजरे यांचे पार्थिव विमानाने १५ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचल्यानंतर तेथून मूळ गाव मंगरूळ नवघरे येथे लष्करी वाहनातून आणल्यानंतर १६ एप्रिलला सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील जवान संदीप दिनकर गोजरे (३३) हे १४ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झाले होते. सध्या ते राजस्थानमधील गंगानगर येथे कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान १४ एप्रिलला त्यांच्या मृत्यूची बातमी धडकताच मंगरुळ नवघरेसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. संदीप गोजरे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ आणि दोन मुले असा परिवार आहे.
वीर जवान संदीप गोजरे गंगानगर येथील कर्तव्यावर असताना त्यांच्यासोबत पत्नी व एका १० वर्षांचा आणि एक ६ वर्षांची अशी दोन मुले सोबत होती. यांच्या पार्थिवासोबत त्यांची दोन कोवळी मुले आहेत. पतीच्या मृत्यूने एवढे मोठे संकट कोसळले असताना संदीप यांच्या पत्नीला सावरायलादेखील कुणी नाही. स्वत:च्या दु:खाला आवर घालायचा की मुलांना सावरायचे अशी स्थिती त्यांच्यावर ओढवली आहे.