संग्रामपूर नगर पंचायतला आग : महत्त्वाच्या कागदपत्रांसह आठ लाखांचे साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:07 AM2018-01-20T00:07:00+5:302018-01-20T00:07:41+5:30
संग्रामपूर : संग्रामपूर नगर पंचायत कार्यालयाला गुरुवारी मध्यरात्री आग लागून लेखा परीक्षण अहवालाच्या दस्तऐवजासह अभिलेख विभागातील कागदपत्रे, फर्निचर असे सात ते आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे आग विझविण्यास विलंब झाला. प्राथमिक अंदाजानुसार यात आठ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : संग्रामपूर नगर पंचायत कार्यालयाला गुरुवारी मध्यरात्री आग लागून लेखा परीक्षण अहवालाच्या दस्तऐवजासह अभिलेख विभागातील कागदपत्रे, फर्निचर असे सात ते आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे आग विझविण्यास विलंब झाला. प्राथमिक अंदाजानुसार यात आठ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीमधून नगर पंचायतीमध्ये २0१४-१५ मध्ये संग्रामपूरचे रूपांतर झाले होते. ग्रामपंचायतीच्याच इमारतीत सध्या नगर पंचायतीचे हे कार्यालय सुरू होते. या ठिकाणी मुख्याधिकार्यांची नेमणूकही करण्यात आली. जुन्याच इमारतीच्या कार्यालयात साहित्य ठेवण्यात आले. थातूरमातूर डागडूजी वगळता फारसा बदल या कार्यालयात झालेला नव्हता. त्यामुळे कार्यालयीन महत्त्वाचे दस्तऐवज, जन्म-मृत्यूच्या नोंदी, महसुली पुरावे यांसह अन्य कागदपत्रे होती. शुक्रवारी पहाटे अचानक अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास नगर पंचायत कार्यालयाला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. नगर पंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या घरांनाही याची झळ पोहोचली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
या आगीत लेखा विभागाचे महत्त्वाचे दस्तऐवज, फर्निचर, कपाट, दोन फॅन, इलेक्ट्रीक साहित्य असे सुमारे आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले असल्याची माहिती नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आर. एस. ढगे यांनी दिली. तामगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसानाची नोंद घेतली
वीज वितरण कार्यालयास तामगाव पोलिसांनी याप्रकरणी पत्र देऊन नेमकी आग कशामुळे लागली, याची माहिती मागितली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने येथे कुठलीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नव्हती. या कार्यालयाचे फायर ऑडिटही झाले होते की नाही, याबाबत स्पष्टपणे माहिती मिळत नाही.
या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांचे आता फायर ऑडिट पुन्हा एकदा होण्याची गरज निर्माण झाली आहे. जळालेल्या रेकॉर्डमुळे नगर पंचायतींतर्गत आता अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी पोलिसांची धाव
आगीची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी. बी. इंगळे, पोलीस उपनिरीक्षक पारवे, जमादार गोले, पोलीस कॉन्स्टेबल शिवा कायंदे, अभिषेक ठाकरे, दीपक मगर, इम्रान शेख यांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. गावातील लोकांनीसुद्धा आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते.
पुन्हा कागदपत्रे मिळतील का!
आगीपासून बचावासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी संग्रामपूर नगर पंचायत सापडली. या ठिकाणी झालेले साहित्याचे नुकसान भरून निघेलही; पण नागरिकांचे महत्त्वाचे कागदपत्रं पुन्हा प्राप्त होणार नाही, ही वास्तविकता आहे.
पोलिसांत तक्रार
याप्रकरणी मुख्याधिकारी आर.एस.ढगे यांनी तामगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून सात ते आठ लाखाचे साहित्य शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत जळाल्याचे म्हटले आहे.