संग्रामपूर नगरपंचायत पर्यवेक्षकास लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:35 AM2018-03-19T01:35:20+5:302018-03-19T01:35:20+5:30
खामगाव(जि.बुलडाणा): स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भाडेतत्त्वावर लावण्यात आलेल्या जेसीबीचे २१ हजार २५३ रुपयांचे भाडे देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणा-या संग्रामपूर नगर पंचायतीच्या प्रभारी सहायक खरेदी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी संग्रामपूर नगर पंचायतीच्या आवारात रंगेहात अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव(जि.बुलडाणा): स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भाडेतत्त्वावर लावण्यात आलेल्या जेसीबीचे २१ हजार २५३ रुपयांचे भाडे देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणा-या संग्रामपूर नगर पंचायतीच्या प्रभारी सहायक खरेदी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी संग्रामपूर नगर पंचायतीच्या आवारात रंगेहात अटक केली.
नंदलाल छगन राठोड (३९) असे लाच घेणा-या व अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मूळचा तो अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील रहिवासी असून, सध्या शेगाव येथील रोकडिया नगरमध्ये राहतो. दरम्यान, मूळ पदस्थापनेवर तो खामगाव पालिकेत कार्यरत असून, संग्रामपूर येथील अतिरिक्त पदभार त्याच्याकडे होता.
संग्रामपूर नगर पंचायत अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत एकाने शहरातील स्वच्छतेची कामे करण्यासाठी भाडेतत्त्वावर जेसीबी लावले होते. त्याच्या मोबदल्याचा २१ हजार २५३ रुपयांचा धनादेश काढण्यासाठी नंदलाल राठोड यांनी संबंधिताकडे २ हजार रुपयांची लाच मागितली होती. धनादेश देत एक हजार रुपयांचे बक्षीसही त्याने घेतले होते. त्यानंतर १८ मार्च रोजी नगर पंचायतीमध्ये १ हजार रुपये घेऊन येण्याबाबत तक्रारकर्त्यास सांगितले होते. प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८ मार्चला सापळा रचून नंदलाल छगन राठोड यास १ हजार रुपयांची लाच संग्रामपूर नगर पंचायत कार्यालय परिसरात स्वीकारताना रंगेहात पकडले. प्रकरणी त्याच्या विरोधात बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या लोकसेवक पदाचा व्यक्तिगत आर्थिक लाभ मिळविण्यासाठी गैरवापर केल्या प्रकरणी (गैरवर्तन) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. भाईक व सहकाºयांनी सापळा रचून नंदलाल राठोड यास अटक केली. या कारवाईत पथकातील संजय शेळके, विजय वारूळे, विजय मेहेत्रे, जगदीश पवार, मधुकर रगड व अन्य सहका-यांनी सहभाग घेतला होता.