संग्रामपूर, नांदुरा, जळगाव तालुक्यात वादळासह गारपिटीचा तडाखा
By सदानंद सिरसाट | Published: February 26, 2024 10:44 PM2024-02-26T22:44:40+5:302024-02-26T22:44:59+5:30
वादळीवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला.
सदानंद सिरसाट, खामगाव (बुलढाणा) : घाटाखालील नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी सायंकाळनंतर ते रात्री उशिरापर्यंत वादळीवाऱ््यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. त्यामध्ये नांदुरा तालुक्यातील डिघी, येरळी, दादगाव, कोदरखेड तर जळगाव जामोद तालुक्यात हिंगणा मानकर, सुनगाव. संग्रामपूर तालुक्यातील एकलारा बानोदा, वरवट बकाल, वडगाव वान यासह अनेक गावांमध्ये संत्र्यासह गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
- संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
संग्रामपूर : सोमवारी रात्री संग्रामपूर तालूक्यातील विविध पिकांना वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसला. त्यामुळे संत्र्यासह गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने अगोदरच आर्थिक डबघाईस आलेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात असंख्य गावांमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला.
सोमवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हाहाकार माजविल्याने रब्बी पिकांसह फळ पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. संग्रामपूर तालूक्यात गहू, ५१३ हेक्टर, हरभरा १५ हजार ९३२ हेक्टर, रब्बी ज्वारी ३७२ हेक्टर, मका ५२२ हेक्टर, कांदा १ हजार ३१७ हेक्टर, भाजीपाला ३५ हेक्टर तर इतर रब्बी पिके १९ हेक्टर असे एकूण १८ हजार ७१० हेक्टरवर रब्बी पिके बहरलेली आहेत. तसेच फळ पिकांमध्ये संत्रा ३ हजार ३२९ हेक्टर, आंबा ६.२ हेक्टर, सीताफळ ३८ हेक्टर, लिंबू २१० हेक्टर, डाळींब १६.२ हेक्टर, पपई १५ हेक्टर, केळी ४५० असे एकूण ४ हजार ६४ हेक्टर जमिनीवर फळ पिके बहरलेली आहेत. यामध्ये सर्वाधिक संत्र्याच्या बागा असून संत्र्याचा मृगबहार तोडणीला आला आहे. दरम्यान सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गार पडल्याने सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.