संजय कुटे बुलडाणा जिल्ह्यातील पाचवे कॅबीनेट मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:38 PM2019-06-17T13:38:22+5:302019-06-17T13:50:26+5:30
जळगाव जामोदचे आ. डॉ. संजय कुटे यांच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याला गेल्या ४२ वर्षांच्या इतिहासात पाचवे कॅबनीटे मंत्रीपद मिळाले आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला आतापर्यंत दहा वेळा मंत्रीपद आले आहे. उपमंत्री, राज्यमंत्री ते कॅबीनेट मंत्री असा बुलडाणा जिल्ह्याचा आलेख आतापर्यंत चढता राहलेला आहे.
जळगाव जामोदचे आ. डॉ. संजय कुटे यांच्या रुपाने बुलडाणा जिल्ह्याला गेल्या ४२ वर्षांच्या इतिहासात पाचवेदा कॅबनीटे मंत्रीपद मिळाले आहे. दरम्यान, ना. डॉ. संजय कुटे यांची १९ वर्षाची कारकीर्द ही राजकारणातील चढता आलेख ठरला आहे. त्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील मंत्रीपद भुषविलेल्यांची माहिती घेतली असता बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांना कबॅनीट मंत्रीपद मिळालेले असून पाच जणांना राज्यमंत्री तर बुलडाण्याचे कै. राजेंद्र गोडे यांना उपमंत्रीपद मिळाले होते.
बुलडाणा जिल्ह्याला अगदी आणिबाणीच्या काही महिने अगोदर प्रथमच कॅबीनेट मंत्रीपद शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना अॅड. अर्जुनराव कस्तुरे यांच्या रुपाने मिळाले होते. त्यावेळी समाजकल्याण खाते ते सांभाळात होते. दरम्यान मधल्या काळातच देशात आणिबाणी घोषित झाली होती. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याचा ओनामा (सुरूवात) अर्जुनराव कस्तुरे यांच्यापासून सुरू झाला होता. आणिबाणी संपताच १९७८ मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना एकाही सभागृहाचे सदस्यव नसलेले बुलडाण्याचे रामभाऊ लिंगाडे यांच्या रुपाने जिल्ह्यास गृहराज्यमंत्रीपद मिळाले होते. नंतर त्यांना एमएलसीवर घेण्यात आले होते. त्या पाठोपाठ १९७९ मध्ये शिवाजीराव पाटील (तपोवनकर) यांना शरद पवार यांच्या मंत्रीमंडळात पाटबंधारे राज्यमंत्रीपद बहाल करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवारांनी बंडखोरी करत पुलोदचे सरकार स्थापन करत आपले मंत्रीमंडळ जाहीर केले होते, असा जिल्ह्याचा रंजक इतिहास आहे.
या पाठोपाठ पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री असताना १९८० च्या दशकात जलपुरुष म्हणून ख्याती मिळवलेले भारत बोंद्रे पाटबंधारे खात्याचे कॅबीनेट मंत्री बनले. त्यांच्या काळातच जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रयत्न झाले. १९९१ दरम्यान, मेहकरचे सुबोध सावजी यांना महसूल राज्यमंत्री म्हणून सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते. त्यापाठोपाठ अवघ्या सहा महिन्यात बुलडाण्याचे कै. डॉ. राजेंद्र गोडे यांना उपमंत्रीपद बहाल करण्यात आले होते. दुसरीकडे युती शासनाच्या काळात सुबोध सावजी यांचा पराभव करून विधीमंडळात प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांना १९९७-९८ दरमयन पाटबंधारे राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्यानंतर अलिकडील काळात डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्यमंत्री आणि शालेय शिक्षण खात्याचा कॅबीनेट मंत्रीम्हणून पदभार सांभाळला होता. दुसरीकडे २०१४ मध्ये महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार आल्यानंतर तथा एकनाथ खडसे यांचे पद गेल्यानंतर भाजपचे जिल्ह्याचे आधारस्तंभ असलेले कै. भाऊसाहेब फुंडकर यांच्या रुपाने जिल्ह्याला पुन्हा कॅबीनेट मंत्रीपद मिळाले होते. कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर हे पद तसे रिक्त राहले.
यांना मिळाले होते कॅबिनेट मंत्रीपद
बुलडाणा जिल्ह्यात प्रथमत: अर्जूनराव कस्तुरे यांच्या रुपाने समाज कल्याण खात्याचे, त्यानंतर भारत बोंद्रे यांना पाटबंधारे खात्याचे कॅबीनेट मंत्रीपद मिळाले. कृषीमंत्री कै. भाऊसाहेब फुंडकर यांच्या रुपाने जिल्ह्यास तिसरे कॅबीनेट मंत्रीपद मिळाले होते. राजेंद्र शिंगणे यांच्या रुपाने जिल्ह्यास चौथे कॅबीनेट मंत्रीपद मिळाले होते. डॉ. संजय कुटे कॅबीनेट मंत्रीपद मिळणारे जिल्ह्यातील पाचवे राजकीय व्यक्ती ठरले आहेत.
स्लॉग ओव्हरमध्ये करावी लागणार बॅटींग
ना. कुटे यांना मंत्रीपद मिळाले असले तरी येत्या काळात विधानसभा निवडणुका होत आहे. त्यामुळे मिळालेल्या अवघ्या काही महिन्यात त्यांना आपले खाते सांभाळत स्लॉग ओव्हरमध्ये दमदार बॅटींग करावी लागणार आहे. कमी वेळात जिल्ह्यासाठी मोठे काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. नाही म्हणायला मराठवाड्यातील वॉटर ग्रीड योजनेचे अप्रत्यक्षरित्या श्रेय हे ना. कुटेंनाच जाते. जळगाव जामोद १४० गाव पाणीपुरवठा योजनेचा अभ्यास करूनच वॉटर ग्रीडची संकल्पना समोर आल्याची चर्चा आहे.