प्राथमिक शिक्षकाचा मुलगा झाला मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:03 PM2019-06-17T14:03:29+5:302019-06-17T14:04:46+5:30
प्राथमिक शिक्षकाचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला याचा श्रीराम कुटेंना अभिमान आहेच, शिवाय सर्व प्राथमिक शिक्षक मनापासून सुखावले आहेत.
- नानासाहेब कांडलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : डॉ.संजय कुटे यांचे वडील श्रीराम कुटे हे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक होते. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांची प्रकृती अत्यंत सुस्थितीत आहे. प्राथमिक शिक्षकाचा मुलगा मंत्रीपदापर्यंत पोहचला याचा श्रीराम कुटेंना अभिमान आहेच, शिवाय सर्व प्राथमिक शिक्षक मनापासून सुखावले आहेत. मुलाकडून पितृदिनाची ही भेटच असल्याची प्रतिक्रिया श्रीराम कुटे यांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यात अर्जुनराव कस्तुरेंपासून भाऊसाहेब फुंडकरांपर्यंत आजतागायत ९ मंत्री होवून गेलेत. जिल्ह्यात दहावे मंत्री होण्याचा मान आ.डॉ.संजय कुटे यांना मिळाला आहे.
जळगाव जामोद मतदार संघाला सुध्दा कित्येक वर्षांपासून मंत्रीपदाची प्रतिक्षा लागून होती, ती रविवारी पूर्ण झाली. मतदार संघातील आम जनतेला मनापासून आनंद झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ना.संजय कुटे यांची ओळख आहे. तसेच पक्षसंघटनेतील त्यांचे कार्य उत्कृष्ट असल्याने त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. जनतेच्या समस्यांचा सुक्ष्म अभ्यास, प्रभावी वत्कृत्व कला, समस्यांवर मात करीत विकासाची गती वाढविण्याची हातोटी आदी त्यांच्यातील कतृत्वाचे फलीत म्हणजे त्यांना मिळालेले हे मंत्रीपद होय, अशी आम जनतेची भावना आहे.
१४० गाव पाणीपुरवठा योजना व मंत्रीपद
विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कार्यरत असताना सुध्दा या भागातील खारपाणपट्यासाठी तत्कालीन सत्ताधारी सरकारकडून जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यासाठी १४० गाव पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली आणि कार्यान्वीत सुध्दा केली. त्यामुळे आता गावागावात वानप्रकल्पातील शुध्द पाणी नागरिकांना मिळू लागले. महिलांची व किडणीग्रस्तांची ‘दुवा’ संजय कुटे यांना मिळाली आणि त्यामुळेच त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली, अशी चर्चासुध्दा मतदारसंघात आहे. शुध्द गोड पाणी व मंत्रीपद असा संबंध या निमित्ताने नागरिकांकडून जोडल्या जात आहे.
ओबीसी नेतृत्वाचे दायित्व!
गोपीनाथ मुंडे व भाऊसाहेब फुंडकर हे दोन ओबीसी नेते काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली. त्या पृष्ठभूमिवर डॉ.संजय कुटे यांना कॅ बिनेट मंत्रीपदाचा मान देत भविष्यात त्यांना भाजपाकडून ओबीसी नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचे ते निकटवर्ती असल्याने यापूर्वीही ओबीसी समितीचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते.