कोरोनामुळे हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:50+5:302021-01-16T04:38:50+5:30
महिलांसाठी संक्रांतीचा सण अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी महिला सौभाग्याची कामना करतात. मकर संक्रात आली की, महिलांची महिन्याभरापूर्वीपासून ...
महिलांसाठी संक्रांतीचा सण अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी महिला सौभाग्याची कामना करतात. मकर संक्रात आली की, महिलांची महिन्याभरापूर्वीपासून दागिने, कपडे, बांगड्या, सौंदर्यप्रसाधने आदींच्या खरेदीस बाजारात गर्दी होत असते. पूर्वी महिला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून घरोघरी हळदी - कुंकवासाठी जातात. यामुळे आपापसातील स्नेह वृद्धिंगत होतो. हा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम जवळपास पंधरा ते वीस दिवस म्हणजे रथसप्तमीपर्यंत चालतो. हळदी-कुंकवास आलेल्या महिलांना वाण देण्यात येते. कालांतराने १० वर्षांपूर्वी यात काहीसा बदल होऊन महिलांनी घरोघरी जाण्याऐवजी गल्ली, कॉलनी, मंडळांच्या १० ते १५ महिला मिळून एकाच ठिकाणी हळदी - कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा पायंडा निर्माण केला. या हळदी-कुंकवाच्या दिवसभराच्या कार्यक्रमात व्याख्यान, आरोग्य शिबिर, स्पर्धा, अल्पोपाहार आयोजन व चांगल्या दर्जाचे गृहोपयोगी साहित्य वाण म्हणून देण्याची प्रथा पडली. परंतु आता या हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये एकी निर्माण होऊन कार्यक्रमात सुटसुटीतपणा आला. महिलांना घरोघरी जाण्यास लागणाऱ्या वेळेत बचत होऊ लागली. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र आल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे महिलांची महिन्याभरापूर्वीपासून चालणारी लगबग थंडावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.