संत रामभाऊ महाराज यांचे अपघाती निधन
By admin | Published: June 25, 2017 09:24 AM2017-06-25T09:24:01+5:302017-06-25T09:24:01+5:30
वाहनातील तिघे गंभीर जखमी : भक्त शोकसागरात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: संपूर्ण महाराष्ट्रभरात ख्याती असलेले व विदेही संत म्हणून ओळखल्या जाणारे तालुक्यातील कोलारा येथील विदेही संत रामभाऊ महाराज यांचे २४ जूनला सायंकाळच्या सुमारास अपघाती निधन झाले आहे. चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाटास्थित त्यांच्या आश्रमपासून १ कि.मी. अंतरावर त्यांच्या वाहनाला एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात रामभाऊ महाराजांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्यभरातील अनुयायींमध्ये तीव्र शोक पसरला आहे.
मूळचे कोलारा येथीलच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील रामभाऊ महाराज अगदी बालवयात असतानापसूनच विदेही संत असल्याची प्रचिती आल्यानंतर गेल्या सहा-सात दशकांत संपूर्ण राज्यभरात त्यांची ख्याती पसरलेली होती. दरम्यान, कोलारा फाटा येथे त्यांचा भव्य आश्रम उभारण्यात आला असून, येथे राज्यभरातून नियमितपणे भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत. तर त्यांच्या अनुयायांद्वारे ठिकठिकाणी आयोजिल्या जाणाऱ्या धार्मिक सोहळ्यांसाठी तसेच शुभकार्यासाठी भाविक त्यांना घेऊन जात होते. आशाच एका धार्मिक कार्यक्रमासाठी बुलडाणा येथील दिलीप जाधव नामक भक्ताकडे गेलेले रामभाऊ महाराज कार्यक्रमापश्चात एम.एच.२८ ए.एन २१६३ या मारुती कारने आश्रमाकडे परतत असताना आश्रमपासून १ कि.मी. अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनास कट मारल्याने झालेल्या अपघातात विदेही संत रामभाऊ महाराज यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सोबत असलेले प्रकाश संपत सोळंकी, दिलीप जाधव व जनार्दन खोरे हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक डॉ. जंवजाळ यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, संत रामभाऊ महाराज यांच्या निधनाची वार्ता पसरताच कोलारा फाटास्थित त्यांच्या आश्रमात भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता आश्रमावर समाधी सोहळा होणार असून, तत्पूर्वी कोलारा गावातून त्यांची परिक्रमा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे विश्वस्त बळीराम सोळंकी यांनी लोकमतशी बोलताना दिली.