संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा; अजिसपुरची राज्यस्तरीय पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:02 PM2019-02-13T12:02:58+5:302019-02-13T12:05:25+5:30
बुलडाणा: तालुक्यातील ग्रामपंचायत अजिसपुरची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची राज्यस्तरीय प्राथमिक तपासणी १२ फेब्रुवारी रोजी पार पडली.
बुलडाणा: तालुक्यातील ग्रामपंचायत अजिसपुरची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची राज्यस्तरीय प्राथमिक तपासणी १२ फेब्रुवारी रोजी पार पडली. यावेळी राज्यस्तरीय तपासणी पथकामध्ये तपासणी समितीचे अध्यक्ष वसंत माने, सदस्य सचिव चंद्रकांत मोरे, सदस्य बाळासाहेब हजारे, सदस्य रमेश पात्रे, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे चंद्रकांत कचरे यांचा यामध्ये समावेश होता. ही राज्यस्तरीय समिती येणार असल्याने बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद सदस्या जयश्री शेळके, बुलडाणा पंचायत समितीच्या सभापती तस्लीमा बी रसुलखॉ, जि. प.चे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक तायडे उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या नेतृत्त्वात ग्रामपंचायत अजिसपूर हे गाव अमरावती विभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातंर्गत अमरावती विभागातून संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेतंर्गत विभागातून प्रथम आले होते. यावेळी ग्रामस्थांनी समिती सदस्यांचे जंगी स्वागत केले. आमदार सपकाळ यांनी बुलडाणी जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात नेहमी कसा अग्रेसर राहिला आहे याची माहिती देतांना यापुर्वी राज्यस्तरावर प्रथम आलेल्या वकाना ग्रामपंचायतीचे उदाहरण दिले. अजिसुपर गावाने गेल्या १५ वषार्पासून स्वच्छतेत नियमितता टिकवून ठेवून आजपर्यत अनेक पुरस्कार मिळवत इथपर्यंत मजल मारली असल्याचे ते म्हणाले. यानंतर तपासणी पथकाने गावातील कुटुंबाना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधत स्वच्छतेबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच गावातील शाळा, अंगणवाडी येथे सुध्दा भेट देत शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी स्वच्छता गृहांची पाहणी, स्वच्छतेच्या संदेशांची अंमलबजावणी आदी बाबींची पाहणी केली. तसेच गावातील सॅनिटरी पॅडची एटीएम मशीन, मोफत पीठ गिरणी, माहेर घराची पाहणी करून उपक्रमाबाबत कौतूक केले. गावातील सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, गोबर गॅस, गांडुळ खताची तपासणी करण्यात आली. सरपंच बाळाभाई जगताप, सचिव पंडीत, ममता पाटील यांनी तपासणी पथकास आवश्यक माहिती दिली. दरम्यान, अजिसपूर हे गाव राज्यस्तरावर जिल्ह्याचे नाव कोरेल असा आशाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांनी व्यक्त केला.
आमदार झाले धुरकरी
तपासणीसाठी आलेल्या या पथकाचे ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर उभे राहून स्वच्छतेच्या घोषणा देत स्वागत केले. भजणी मंडळांनी टाळ-मृदुंगाच्या नादात त्यांचे स्वागत केले. वेशीवरच सजवलेल्या बैलगाडीत तपासणी पथकातील सदस्य बसताच आ. हर्षवर्धन सपकाळ हे स्वत: या बैलगाडीचे धुरकरी झाले. त्यावेळी संपूर्ण पथक अक्षरश: भारावून गेले. यावेळी समिती अध्यक्ष वसंत माने म्हणाले की, आजपर्यंतचा हा आमच्या जीवनातील खुप वेगळा अनुभव होता. स्वत: आमदार साहेब सारथी झाल्याने आम्ही सर्व भारावून गेलो अशी भावना व्यक्त केली.