सामाजिक भवनातील अतिक्रमणामुळे सरपंच निवड एक दिवस लांबणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:13 AM2021-02-11T11:13:25+5:302021-02-11T11:13:31+5:30
Sarpanch election सामाजिक भवनातच एका ग्रामस्थाने अतिक्रमण करत घर थाटल्याने लोणार तालुक्यातील खळेगाव येथील सरपंच निवडीची सभाच १० फेब्रुवारी रोजी होऊ शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : गावातील सामाजिक भवनातच एका ग्रामस्थाने अतिक्रमण करत घर थाटल्याने लोणार तालुक्यातील खळेगाव येथील सरपंच निवडीची सभाच १० फेब्रुवारी रोजी होऊ शकली नाही. त्यामुळे सरपंच निवड एक दिवस लांबणीवर पडली. ता ही सभा ११ फेब्रुवारी रोजी खळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या अजब प्रकाराची सध्या तालुक्यात चर्चा आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर लोणार तालुक्यात सरपंच निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सभा नियोजित करण्यात आली. खेळगाव येथेही बुधवरी सभा बोलावण्यात आली होती. मात्र समाज भवनातच एकाने अतिक्रमण केलेले असल्याने ही नियोजित सभाच तहसील प्रशासनास एक दिवस पुढे ढकलावी लागली आहे.
खळेगाव ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ आहे. या नऊ सदस्यांतून सरपंच निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली असल्याची नोटीस ६ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांना पाठविण्यात आली होती. ही सभा खेळगावातील समाज भवनात घेण्यात येणार असल्याचे संबंधित नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुषंगाने नवनिर्वाचित सदस्य, अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी व्ही.पी. नागरे, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस खेळगावात हजर झाले. मात्र समाज भवनामध्ये अतिक्रमण करून एकाने घर थाटल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित सरपंच निवडीची सभा ही निर्धारित स्थळी घेणे प्रशासनास शक्य नव्हते. दरम्यान, येथील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता नायब तहसीलदार विजय पिंपरकर हेही खळेगाव येथे पोहोचले. मात्र निर्धारित स्थळी सभा घेणे अतिक्रमणाच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हते. आता ही सभा ११ फेब्रुवारी रोजी खळेगावामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आता ११ फेब्रुवारीला काय होते याकडे सध्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.
समाज भवनामध्ये ही सभा घेण्यात येणार असल्याचे आधीच ग्रामसेवकास स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्यांनी संबंधित प्रकाराबाबत कल्पना दिली नाही. आता तहकूब झालेली सभा ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत घेण्यात येईल.
सैफन नदाफ
तहसिलदार, लोणार
समाज भवनामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र संबंधितांनी त्या स्वीकारल्या नाही. यामुळे सरपंच निवडणूक नियोजित जागेअभावी रद्द करण्यात आली.
नंदकिशोर तेजनकर,
सचिव,
ग्रामपंचायत, खळेगाव