सरपंच, उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
By Admin | Published: August 12, 2015 12:01 AM2015-08-12T00:01:10+5:302015-08-12T00:01:10+5:30
प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू ; ३१ ऑगस्ट व ९ सप्टेंबर रोजी होणार निवड.
बुलडाणा : जिल्हय़ातील ५२१ ग्रामपंचायतींपैकी अविरोध झालेल्या २८ ग्रामपंचायती वगळून ४९३ ग्रामपंचायतमध्ये ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. त्यामुळे आता निवडून आलेल्या उमेदवारांनी सरपंच,उपसरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, ३१ ऑगस्ट रोजी २२८ तर ९ सप्टेंबर रोजी २८८ ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंचाची निवड होणार आहे. तर उर्वरित पाच ग्रामपंचायतीचे सरपंच निवडीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतीपैकी २२८ ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्ट महिन्यात तर २८८ ग्रामपंचायतीची मुदत सप्टेंबर महिन्यात तर ५ ग्रामपंचायतीची मुदत ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे नियमानुसार ऑगस्ट महिन्यात मुदत संपत असलेल्या २२८ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा ऑगस्टमध्ये होणे आवश्यक आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी २२८ ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्या २८८ ग्रामपंचायतींची सभा ९ सप्टेंबर रोजी होणार असून, सरपंच, उपसरपंचपदाची निवड होणार आहे. या सभेंचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तालुक्याचे तहसीलदार करणार असून लवकरच पिठासिन अधिकार्यांची निवड होणार आहे. जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतीपैकी २६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण महिलांसाठी निघाले आहे. त्यामुळे २६१ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे, तसेच अनेक ग्रामपंचायतीचे महिला आरक्षण नसताना खुल्या किंवा त्या ग्रामपंचायतीच्या जातनिहाय आरक्षण असलेल्या महिलांची निवड होण्याची शक्यता आहे. एकूणच आरक्षण असलेल्या २६१ ग्रामपंचायतीपेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर महिला राज येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून सदस्यांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.