सरपंच टँकरद्वारे भागवत आहेत ग्रामस्थांची तहान; अत्रंज येथे नि:शुल्क पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:34 PM2019-05-18T13:34:31+5:302019-05-18T13:34:50+5:30
खामगाव : तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
खामगाव तालुक्यातील अंत्रज हे सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. गावातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी सरपंच शिवराज महाले आणि मित्र मंडळाच्यावतीने स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १५ मार्चपासून गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २०० लीटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. गावातील पाणी टंचाई निवारणार्थ, तसेच नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी गत दोन महिन्यांपासून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत असल्याचे सरपंच शिवराज महाले यांनी सांगितले.
भारनियमनामुळे पाणी समस्या!
ग्रामीण भागात वाढत्या भारनियमनामुळे नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अंत्रज येथेही पाण्याचे नि:शुल्क वितरण करताना ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंच शिवराज महाले मित्र मंडळाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.