आरक्षित जागेवरील सदस्य नसल्याने देऊळघाटचे सरपंचपद रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:59+5:302021-02-10T04:34:59+5:30
देऊळघाट : बुलडाणा तालुक्यातील माेठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळघाटचे सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले हाेते. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ...
देऊळघाट : बुलडाणा तालुक्यातील माेठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळघाटचे सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले हाेते. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या प्रवर्गातील एकही महिला सदस्य निवडून आलेली नाही. त्यामुळेे ९ फेब्रुवारी राेजी केवळ उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये आरीफ खान यांनी ९ मते घेत विजय मिळवला.
बुलडाणा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये देऊळघाटचा समावेश आहे. या ग्रामपंचायतच्या १७ जागासांठी १५ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. सरपंचपद एससी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले होते. मात्र गावातील दोन्ही पॅनेलमध्ये एकही एससी महिला सदस्य निवडून न आल्यामुळे सरपंचपद रिक्त राहिले आहे. मंगळवारी ग्रामपंचायत भवनमध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यावेळी सरपंच पदासाठी रूपचंद पसरटे तसेच उपसरपंच पदासाठी आरिफ खान, सर्जेराव जाधव, इस्माईल खान व अ. रज्जाक यांनी अर्ज दाखल केले हाेते. त्यापैकी सर्जेराव जाधव व अ. रज्जाक यांनी आपले अर्ज मागे घेतले. सरपंचपदासाठी महिला उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला नाही. सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने पुरुष उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला व केवळ उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यावेळी आरिफ खान यांना ९ तर इस्माईल खान यांना ८ मते मिळाली. त्यामुळे आरिफ खान यांना उपसरपंच पदासाठी विजयी घोषित करण्यात आले. अध्यासी अधिकारी म्हणून नायब तहसीलदार अमरसिंह पवार यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी व मोठ्या प्रमाणात पोलिस बल तैनात होते. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.