वन्य प्राण्यांसाठी ज्ञानगंगा अभयारण्यात ‘साटण लोटण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 10:46 AM2021-03-27T10:46:56+5:302021-03-27T10:47:03+5:30
Gyanganga Sanctuary पाणवठ्याच्या जवळ मीठ व माती कालवून साटण लोटण करण्यात येते.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : उन्हाळ्यात ज्ञानगंगा प्रकल्पातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात येत असून, साटण लोटण करण्यात येत आहे. पाणवठ्याच्या जवळ मीठ व माती कालवून साटण लोटण करण्यात येते. प्राण्यांचे पगमार्क ओळखण्यासाठी व उन्हाळ्यात थंडावा राहण्यासाठी साटण लोटण करण्यात येते.
बुलडाणा जिल्ह्यात २०५ चौरस किमी परिसरात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, नीलगाय, रानडुकर आदी प्राणी आढळतात. तसेच मोर, चिमणी, कावळा, पोपट, तितर, बटर यासह अनेक पक्षी आहेत. बुलडाणा व खामगाव अशा दोन परिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य पसरले आहे. उन्हाळ्यात या अभयारण्यातील नैसर्गिक पाणवठे सुकतात. त्यामुळे वनविभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणी टाकण्यात येते. ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव विभागाच्यावतीने ८२ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याचा कंत्राट देण्यात आला असून, नियमित पाणी टाकण्यात येत अ सल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच या सर्व पाणवठ्यांच्या बाजूला साटण व लोटण करण्यात येत आहे. याबाबत माहिती देताना वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी सांगितले, की पाणवठ्याच्या चहूबाजूने माती व मीठ कालवून ठेवण्यात येते. या ठिकाणी प्राणी लोळतात. त्यामुळे त्यांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळतो. तसेच पाणवठ्याच्या परिसरात रेती व माती टाकून ओली करण्यात येते. वन्यप्राण्यांचे पगमार्क यावर उमटत असून, कोणता प्राणी पाणी पिण्यासाठी आला होता, याची माहिती मिळते. त्यामुळे दरवर्षी पाणवठ्यांच्या बाजूला साटण लोटण करण्यात येत असल्याचे सुरवसे यांनी सांगितले.
ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकण्यात येत असून, साटण लोटण करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात येत आहे. तसेच प्राण्यांना उन्हापासून दिलासा मिळावा व त्यांचे पगमार्क ओळखता यावे यासाठी साटण लोटण करण्यात येत आहे.
- मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, बुलडाणा.