राहुल बोंद्रे यांचा पोलीस ठाण्यात बैठा सत्याग्रह!

By admin | Published: May 17, 2017 01:21 AM2017-05-17T01:21:03+5:302017-05-17T01:21:03+5:30

१८ मेपासून आमरण उपोषण करणार

Satyagraha sat in the police station of Rahul Bondre! | राहुल बोंद्रे यांचा पोलीस ठाण्यात बैठा सत्याग्रह!

राहुल बोंद्रे यांचा पोलीस ठाण्यात बैठा सत्याग्रह!

Next

चिखली : शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन चिरडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात झालेल्या तोडफोडप्रकरणी आ. राहुल बोंद्रे व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत याचा जाब विचारण्यासाठी जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा फौजफाटा १६ मे रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला धडकताच प्रशासन चांगलेच हादरले. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी लढताना असले लाख गुन्हे कबूल असून, गुन्हे दाखल केलेच आहे तर आता अटक करा’, अशी भूमिका घेत आ. बोंद्रेंसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास पोलीस स्टेशनमध्येच बैठा सत्याग्रह केला.
यादरम्यान शिष्टाईसाठी सरसावलेल्या प्रशासनाने येत्या तीन दिवसांत युद्ध स्तरावर तूर खरेदी करण्याचे आश्वासन देत त्यानुषंगाने प्रत्यक्ष कारवाईलादेखील सुरुवात केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले; मात्र तूर खरेदीस विलंब झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ मेपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष आ. बोंद्रेंनी दिला.
पावसाळ्याची चाहूल लागली असतानाही जिल्हाभरात अत्यंत संथ गतीने तूर खरेदी होत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. याचा जाब विचारताना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात १५ मे रोजी झालेल्या तोडफोडप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांची तूर मोजून घेण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाने आ. बोंद्रेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करताना का घाई केली, त्यासाठी विलंब का लावला नाही, तसेच खोटे गुन्हे का दाखल केले, याचा जाब विचारण्यासाठी १६ मे रोजी जिल्हा काँगे्रसची मातब्बर नेतेमंडळी, चिखली येथील कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला धडकला. या ठिकाणी ‘शेतकऱ्यांसाठीचे आंदोलन चिरडण्यासाठी व सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आ. बोंद्रेंनी करून गुन्हा दाखल केलाच आहे तर आता अटक करा, अशी भूमिका घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्येच बैठा सत्याग्रहास सुरुवात केली. दरम्यान, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल जरी असला, तरी अटक करण्याचे किंवा न करण्याचे अधिकार तपास अधिकाऱ्याला असल्यामुळे तूर्तास अटक करता येणार नाही, असा बचावात्मक पवित्रा पोलिसांनी यावेळी घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी बी. महामुनी, ठाणेदार अंबादास हिवाळे यांनी आंदोलकांशी सुमारे तासभर चर्चा करूनही ‘आम्हाला अटक करा’, अशी ताठर भूमिका घेतल्याने पोलीस हतबल ठरले होते. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, तहसीलदार सुरेश बगळे यांनी येथे येत प्रशासनाच्यावतीने शिष्टाई करून येत्या तीन दिवसांत यद्ध स्तरावर तूर खरेदी करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर तब्बल तीन तासांनंतर हा बैठा सत्याग्रह मागे घेण्यात आला; मात्र तीन दिवसांनंतरही हाच प्रकार सुरू राहिल्यास १८ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिला. तत्पूर्वी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
यामध्ये जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांनी डीएमओ कार्यालयात झालेल्या तोडफोडप्रकरणी आपली भूमिका विशद करताना तुरीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करून याप्रकरणी यापूर्वीही निवेदने देऊन, आंदोलने करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यावर उपाययोजना करण्याऐवजी शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी घायकुतीला आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडफोड केली; मात्र शेतकऱ्यांवरचा अन्याय न पाहता पोलिसांनी डीएमओच्या फिर्यादीवरून आंदोलकांवर एका तासाच्या आत गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणे हा जर गुन्हा असेल, तर आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही लढा देतच राहू, अशी गर्जना यावेळी आ.बोंद्रे यांनी केली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, जि. प. सदस्य अ‍ॅड. जयश्री शेळके, मलकापूर नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, माजी जि. प. अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर, बलदेवराव चोपडे, समाधान सुपेकर, डॉ. सत्येंद्र भुसारी, लक्ष्मणराव घुमरे, मीनल आंबेकर, सुनील तायडे, शरद राखोंडे, सुनील सपकाळ, दत्ता काकस, राहुल सुरडकर, बबलू मावतवाल, दीपक रिंढे, सतीश मेहेंद्रे, राजू काटीकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Satyagraha sat in the police station of Rahul Bondre!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.