गांधी हत्येला सावरकर,संघ, हिंदू महासभा जबाबदार
By admin | Published: February 6, 2016 02:13 AM2016-02-06T02:13:36+5:302016-02-06T02:13:36+5:30
तुषार गांधी यांनी त्यांच्या व्याख्यानातून संदर्भासहित उलगडून दाखविले गांधी हत्येचे षड्यंत्र.
बुलडाणा: बापूंच्या प्रार्थनेच्या वेळी २0 जानेवारी १९४८ ला बॉम्बस्फोट झाला. त्यावेळी मदनलाल पकडला गेला. त्यानंतर दहा दिवसांमध्येच त्यांची हत्या नाथुराम गोडसेने केली. ही हत्या करण्यासाठी गोडसेकडे पिस्तूल आले कोठून? त्यासाठी पैसा कुणाचा होता? सावरकरांचा आशीर्वाद नाथुराम आणि आपटे यांनी कशासाठी घेतला होता? सावरकरांनी त्यांना विजयी होऊन या, हा आशीर्वाद कशासाठी दिला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून कधीच झाला नाही; मात्र ऐतिहासिक दस्तावेज अन् हत्येची संगती लावली, तर हत्येला सावरकर, संघ अन् हिंदू महासभा जबाबदार असल्याचे सत्य समोर येते, असा घणाघाती आरोप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले. आम्ही सारे फाउंडेशनच्यावतीने शुक्रवारी गर्दे सभागृहात गांधी हत्येमागील षड्यंत्र या विषयावरील व्याख्यानात तुषार गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची उपस्थिती होती.