पैशाची बचत करताय. पाणी आणि विजेचे काय ?
By Admin | Published: October 29, 2014 10:47 PM2014-10-29T22:47:25+5:302014-10-29T23:01:53+5:30
आज काटकसर दिन : नागरिकांनी संकल्प घेण्याची गरज
बुलडाणा : पैशाची बचत करण्यासाठी प्रत्येकजण जीवाचा आटापिटा करतो. भविष्याची तरतूद म्हणून कमावलेल्या रकमेतून काही रक्कम शिल्लक टाकण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून केला जातो; मात्र वर्तमान आयुष्य सुखद करणार्या पाणी आणि विजेच्या बचतीबाबत सारेच निष्काळजी असतात. पैशाची बचत करण्यासाठी काटकसर केली जाते; मात्र पाणी आणि वीज वाचवण्यासाठी काटकसर होत नाही. आज जागतिक काटकसर दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने पाणी आणि विजेचा वापर काटकसरीने करण्याचा संकल्प केला तर वर्तमानासोबत भविष्यही अधिक सुखद होईल.
बुलडाणा शहराच्या दृष्टीने पाणी आणि विजेचा वापर, मागणी आणि पुरवठा याचा विचार केला तर या बाबतीत काटकसर करणे अत्यावश्यक असल्याची बाब समोर आली आहे. बुलडाणा शहरात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण १५ हजार ९२७ घरे आहेत. या प्रत्येक घरामध्ये नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो; मात्र प्रत्यक्षात केवळ नऊ हजार ५९0 एवढय़ाच घरांमध्ये नळजोडणी आहे. उर्वरित सहा हजार ३३७ घरांचा पाणीपुरवठा हा सार्वजनिक नळावरून किंवा अवैध नळ जोडण्यावरून होतो, यात शंका नाही.
बुलडाणा शहराला दररोज ९0 लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. यासाठी तीन दिवसाआड पाणी दिले जाते. अवैध नळ जोडणी, लिकेजेस यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर होतो. हे टाळण्यासाठी अशा जोडण्या वैध केल्या तर पाण्याची बचत होईल. तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरीही सर्वसामान्यांचा पाणीवापर हा काटकसर व बचतीचा नाही, हे सर्वच मान्य करतील.
गेल्या उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागल्यानंतर गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली व पाण्याची साठवण क्षमता वाढली. सुदैवाने यावर्षी पाऊसही पुरेसा झाला, त्यामुळे पाण्याच्या दुष्काळाचे सावट नक्कीच तीव्र राहणार नाही. पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही तर उपलब्ध पाणीही जास्त दिवस पुरणार नाही.