सावित्रीची प्रार्थना आता कोरोनापासून बचावाची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:52 AM2020-06-05T10:52:39+5:302020-06-05T10:53:03+5:30
यंदा सावित्रीची ही प्रार्थना केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नव्हे, तर कोरोनापासून प्रत्येकाच्या बचावासाठी करण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: वटसावित्रीच्या दिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदा सावित्रीची ही प्रार्थना केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नव्हे, तर कोरोनापासून प्रत्येकाच्या बचावासाठी करण्याची वेळ आली आहे. ५ जून रोजी असलेल्या वट पौर्णिमेवर कोरोनाची गडद छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पहिल्यांदाच आपल्या घरीच वट पौर्णिमेचे पूजन करावे लागणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसत आहे. कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धार्मिक कार्यक्रमही बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे हे संकट वटपौर्णिमेवरही निर्माण झाले आहे. वटपौर्णिमा सण सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा समजल्या जातो. सुवासिनी महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वडाचे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाच्या साक्षीने महिला श्रद्धाभावाने उपवास करून हे व्रत करतात. मात्र यंदा ५ जून रोजी होणाऱ्या वटपौर्णिमेवर कोरोनाचे संकट निर्माण झालेले आहे. पतीच्या दीर्घायुष्यासोबत कोरोनाचे हे संकट टाळण्याची प्रार्थना महिलांकडून होणार आहे. महिलांचा महत्त्वाचा सण कोरोनामुळे घरातच साजरा करण्याची वेळ आली आहे. वडाजी पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी होते. महिला व युवतींची ही मैफिल कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढविण्याची भीती व्यक्त होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा प्रश्नही यानिमित्त समोर येत आहे. घरातच हे पूजन केले तर संसर्गापासून बचाव होऊ शकतो.
सौभाग्यलंकारामध्ये मास्क
सौभाग्यलंकार परिधान करून महिला वडाजी पूजा करण्यासाठी बाहेर पडतात. परंतू या सौभाग्यलंकारामध्ये महिलांना मास्कचाही वापर करावा लागणार आहे. नटणे, सजणे यामध्ये मास्क सुद्धा महत्त्वाचे झाले आहे.
कोरोनाचे हे संकट पाहता प्रत्येक महिलेने आपल्या घरातच वट सावित्रीचे हे व्रत पूर्ण करणे आवश्यक आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी एकाच ठिकाणी महिलांची गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
- लता देशमुख, मेहकर.
वटसावित्रीचे पूजन महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. परंतू यंदा कोरोनामुळे ही पूजा घराबाहेर पडून करणे धोक्याचे आहे. त्यामुळे आम्ही घरातच हे विधीवत हे पूजन पूर्ण करून कोरोनाचे संकट टळण्याची प्रर्थना करू.
- रश्मी पाध्ये, बुलडाणा.