पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारप्रकरणी सावजी पुन्हा आक्रमक; बेमुदत उपोषणाच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:38 PM2018-04-05T18:38:27+5:302018-04-05T18:38:27+5:30
बुलडाणा : पायाभूत सुविधांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आणणारे काँग्रेसचे मजी राज्यमंत्री सुबोध सावजी या प्रश्नी पुन्हा आक्रमक झाले असून बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते बेमुदत उपोषण करणार आहेत.
बुलडाणा : जिल्ह्यातील शासकीय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील साडेचारशे गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाणीपुरवठा, रस्ते विकासासह अन्य पायाभूत सुविधांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आणणारे काँग्रेसचे मजी राज्यमंत्री सुबोध सावजी या प्रश्नी पुन्हा आक्रमक झाले असून बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. त्यांच्या गावनिहाय दौर्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सध्या चांगलीच जेरीस आली असू समितीच्या मागण्यांवर विभागीय आयुक्तांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यानंतरही अनुषंगीक कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी ही आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली आहे. शासकीय नळपाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, खारपाणपट्यात किडनी आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना चार लाख रुपये नुकसानभरपाई आणि डायलिसीसवर असलेल्यांना दोन लाख रुपये शासकीय मदत दिली जावी, खारपाणपट्यात किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी जास्तीचे आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, किडणी आजाराने ग्रस्त असलेले, मृत्यू झालेल्यांची गणना शासकीय यंत्रणेने घ्यावी, बंद असलेल्या आरोग्य केंद्रांवर कारवाई केली जावी, ज्या गावात गावकरी पाणी विकत घेऊन पितात, तेथील नागरिकांना शासकीय पाणीभत्ता दिला जावा, जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर वार्षिक भ्रष्टाचाराचा आढआवा घ्यावा यासारख्या १३ मागण्यांसाठी सुबोध सावजी ११ एप्रिल पासून बेमुदत व साखळी उपोषण करणार असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केले आहे.
काँग्रेस मेळाव्यात चर्चेची शक्यता
शेगावात काँग्रेसचा ‘व्हीजन २०१९’ मेळावा होत आहे. या मेळाव्यातही सावजींच्या या आंदोलन आणि ४५० गावांच्या भेटींचा गोषवारा या मुद्द्यावर शेगावातील मेळाव्यात चर्चा होणे अपेक्षीत आहे. जिल्ह्या सावजींच्या गावभेटीच्या धडाक्याची दखल भाजप व सेनेच्या नेत्यांनीही घेतलेली आहे. राजकारण बाजूला ठेऊन पाणीप्रश्न निकाली काढण्याची भाषा या दोन्हीपक्षातील नेते करीत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या व्हीजन २०१९ मध्ये सावजीच्या या पाठपुराव्यास काँग्रेस कोणता आधार देते हे ही लवकरच स्पष्ट होईल.