विद्यार्थ्यांसाठी आता ‘नमस्कार’ म्हणा आणि स्वाध्याय सोडवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 05:26 PM2020-12-15T17:26:25+5:302020-12-15T17:26:32+5:30
Education Sector News विद्यार्थ्यांना ‘नमस्कार अथवा हॅलो’ असे लिहून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : हल्ली मोबाइलवरूनच हाय, हॅलो, नमस्कार सुरू असतात; परंतु आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मोबाइलद्वारे स्वाध्याय योजना सुरू केली असल्याने हाच नमस्कार विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडविण्यासाठी मित्र बनून मदतीला आला आहे. विद्यार्थ्यांना ‘नमस्कार अथवा हॅलो’ असे लिहून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार शाळांमध्ये हा उपक्रम राबविल्या जात आहे. संवाद व संपर्क प्रभावीपणे साधणारे माध्यम मोबाइल आहे. कोरोनाच्या प्रभावाने प्रत्येक क्षेत्रात बदल झाला. पहिलीच्या मुलांपासून ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल, संगणक, लॅपटॉप आला आहे. ही माध्यमे आता अभ्यास करण्याचे केंद्रबिंदू बनले आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करण्याला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनीदेखील चालना दिली आहे.
पहिली ते दहावीपर्यंत मोबाइलद्वारे स्टुडंट व्हॉट्सॲप बेस डिजिटल होम असेसमेंट या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रश्न प्राप्त होणार असून, मुलांना स्वाध्याय करण्यास प्रेरित करणारा हा उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांना क्रियाशील बनविणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांना लिंकद्वारे व्हाॅटसॲप ग्रुपशी कनेक्ट व्हावे लागेल. त्यानंतर हॅलो किंवा नमस्कार टाइप करून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान तसेच या उपक्रमाची माहिती व व्याप्ती वाढवणे हा हेतू आहे.
शिक्षक, पालक विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल नियमित माहिती मिळू शकणार आहेत. त्यामुळे शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांना सोईचे होणार आहे. विद्यार्थी, पालकांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे.
अशी होणार ऑनलाइन चाचणी
सध्या मराठी भाषा, सेमी इंग्रजी माध्यमासाठी मराठी, गणिताचे विषय सुरू करण्यात आले आहेत. स्वाध्याय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांद्वारे दर आठवड्याला विषयनिहाय प्रश्न दिले जाणार आहेत.
n त्यानंतर ऑनलाइन चाचणी होईल. ही प्रक्रिया दीर्घकालीन व नियमित चालणार आहे. विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजूषा घरच्या घरी उपलब्ध करून दिली जाईल.