घरपोच कच्चे धान्य वितरणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:53 PM2019-08-27T14:53:27+5:302019-08-27T14:53:42+5:30

निर्धारित केलेल्या मालापेक्षा कमी माल वितरीत केल्या जात असल्याने अनेक लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे.

Scam in Raw food grain distribution at home in Khamgaon | घरपोच कच्चे धान्य वितरणात घोळ

घरपोच कच्चे धान्य वितरणात घोळ

googlenewsNext

अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: अंगणवाडी स्तरावर वितरीत केल्या जाणाऱ्या कच्च्या धान्याच्या वितरणात मोठ्याप्रमाणात घोळ केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. सिलबंद पाकीटाऐवजी खुले धान्य वितरीत करून निर्धारित केलेल्या मालापेक्षा कमी माल वितरीत केल्या जात असल्याने अनेक लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
अंगणवाडी स्तरावर घरपोच आहार वितरणातील गैर व्यवहारास आळा बसविण्याशाठी शासन आणि आयुक्तांनी लाभार्थी निहाय सर्व कच्चे धान्य असलेली ५० दिवसांसाठी एक मोठी सीलबंद पिशवी तयार करण्यात यावी. त्यानंतर या पिशवीचे संबंधितांना वितरण करण्याचे निर्देशीत केले आहे. मात्र, ५० दिवसांसाठी सर्व माल असलेल्या सिलबंद पिशवी ऐवजी कंत्राटदाराकडून खुले धान्य वेगवेगळ्या पिशव्यांमधून वितरीत करण्यात येत आहे. उल्लेखनिय म्हणजे कच्च्या धान्याचे वितरण करताना अंगणवाडी सेविकांकडून पावतीवर दिनांक, वाहन क्रमांक आदींची नोंद केली जात नाही. परिणामी, माल कधी आला अथवा आलाच नाही, याबाबतही सांशकता निर्माण होत आहे. यासंदर्भात बाल कल्याणचे उप मुख्याधिकारी रामरामे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होवू शकले नाही.

कच्चे धान्य वितरणातील लाभार्थी!
अंगणवाडी मधील ०६ महिने ते ०३ वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदा माता तसेच कमी वजनाची बालके आणि ११ ते १४ वर्ष वयोगटातील कुमारवयीन मुलींना लाभार्थी निहाय सीलबंद पाकीटमध्ये कच्चे धान्य पुरवठा करण्यासाठी शासनाने ३० मार्च २०१९ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. यासाठी लाभार्थी निहाय पाककृती निश्चित करून महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनला पर्यायी व्यवस्थेतंर्गत कंत्राट देण्यात आला आहे. त्यानुसार फेडरेशनने प्रत्येक जिल्ह्यात वितरणासाठी कंत्राटदार नियुक्त केलेत. याकंत्राटदारांकडून सीलबंद पाकीटात संबधीत धान्याचा पुरवठा होत नसल्याने वितरणात खोळंबा निर्माण झाला आहे.

निर्धारित धान्यांपासून लाभार्थी अनभिज्ञ!
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांनी ठरवून दिलेल्या मालाच्या प्रमाणाबाबत संबंधित कंत्राटदारांकडून कमालिची गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान, शासनाकडून कोणते धान्य, किती प्रमाणात वितरीत केले जाते याबाबत लाभार्थी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडून दिल्या जाणारे खुले पाकीट लाभार्थी घेऊन जाताहेत. गत सहा महिन्यांपासून सीलबंद पाकीटांऐवजी खुले धान्य वितरीत करून लाभार्थ्यांची लूट केली जात असल्याची चर्चा आहे.

स्तनदा माता आणि गरोदर महिलांनाही अपुरा आहार!
स्तनदा माता, गर्भवती महिला आणि किशोर वयीन मुलींना ५० दिवसांसाठी ३.७७५ किलो गहू देणे बंधनकारक आहे. त्यासाठी १.८८७ किलोच्या दोन पिशव्या देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी गव्हाची एकच पिशवी दिली जात आहे.
तसेच पाककृतीनुसार निर्धारीत वजनाचे २ प्रकारचे कडधान्य, २ प्रकारची डाळ देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अपुरे धान्य वितरीत करून पूर्ण मालाचे देयक काढण्यात येत आहे.

अंगणवाडीतील घरपोच कच्चे धान्य वितरणासंबधीत यापूर्वी देखील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने चौकशीचे आदेश आपण दिले होते. अद्यापही कमी धान्य मिळत असल्याच्या तक्रारी असतील तर, जिल्हा परिषदेकडे सादर कराव्यात. त्यांची नि:पक्ष चौकशी केली जाईल. संबधितांवर कारवाई देखील केली जाईल.
- श्वेता महाले-पाटील
सभापती, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद बुलडाणा.

 

Web Title: Scam in Raw food grain distribution at home in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.