योजना दोन कोटींची; पण नळाला दोन थेंब पाणी येईना...
By विवेक चांदुरकर | Published: July 13, 2024 03:48 PM2024-07-13T15:48:56+5:302024-07-13T15:49:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घारोड : गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता दोन कोटी रुपये खर्च करून नळ योजना व पाण्याच्या टाकीचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
घारोड : गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता दोन कोटी रुपये खर्च करून नळ योजना व पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, सहा महिन्यांपासून गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही. त्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
घारोड येथे गेल्या २२ नोव्हेंबर रोजी ‘जलजीवन मिशन’अंतर्गत नळयोजना व पाण्याची टाकी, असे दोन कोटी रुपयांच्या योजनेचे उद्घाटन मराठी पूर्व माध्यमिक शाळा घारोडजवळ मोठ्या थाटामाटात करण्यात आले; पण कामाच्या संथगतीने व गावपातळीवरील राजकीय फायद्यामुळे योजना रखडली. पुन्हा नव्याने ही योजना राबविण्यात सुरुवात झाली. निरोड व घारोड मधोमध धरणांमध्ये विहीर खोदली; पण पाणी न लागल्याने पुन्हा दुसरीकडे घारोड भागात विहिरीच्या कामाची सुरुवात करण्यात आली. पुन्हा अपयश आले त्या विहिरीला सुद्धा पाणी नाही लागले. त्यानंतर लाखनवाडा येथे रायधर धरणाच्या कुशीत तिसऱ्यांदा विहीर खोदण्यात आली. त्या विहिरीला पाणी लागले. मात्र, अद्याप नागरिकांना पाणी मिळाले नाही.
आता शेतीची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना शेतातून १ किमीवरून पाणी आणावे लागत आहे. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना गावांमध्ये पाइपलाइन करण्यात आली. ही नवीन नळ योजना जुन्या योजनेशी जोडून सुरू करण्यात आली. मात्र, वाॅर्ड नं. २ मध्ये ५० टक्के नळाला पाणी येत नाही.
ग्रामपंचायतच्या ठरावाला केराची टोपली
ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठराव घेतला होता. कोणीही नागरिक नळाला मोटर लावणार नाही; पण नागरिकांनी ग्रामपंचायतचा ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. सर्व नागरिक नळावर मोटर लावून पाणी भरत आहेत. परिणामी, ५० टक्के नागरिकांचा नळाला पाणी येत नाही.