गुणपडताळणीनंतर कळणार शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:38 PM2019-05-20T12:38:42+5:302019-05-20T12:39:11+5:30
गुणपडताळणीचे आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
बुलडाणा: राज्य परीक्षा परिषदेमार्फत २४ फेबु्रवारी रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १६ मे रोजी घोषीत करण्यात आला. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून त्यासाठी २७ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुणपडताळणीचे आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी राज्यभर २४ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरूवारी १६ मे रोजी दुपारी तीन वाजता आॅनलाईन जाहीर झाला. विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून दिल्यानंतर या निकालाविषयी काही हरकती असल्यास निकालाच्या छायांकित प्रतीसह परिषदेकडे अर्ज करता येतो. तसेच गुणपडताळणी करण्यासाठीही अर्ज करता येतो. यावर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास अर्ज करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १६ ते २७ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुदतीमध्ये आॅनलाईन प्राप्त झालेल्या अजार्नुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येणार आहे. मुदतीत आॅनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी २७ मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेनंतरच अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे निर्देश राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिले आहेत.
गुण पडताळणीसाठी ५० रुपये शुल्क
विद्यार्थ्यांना गुुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. गुणांच्या पडताळणीची प्रक्रिया आॅनालाईन राबविण्यात येत असताना पेपरची ५० रुपये शुल्काची रक्कमही आॅनलाईन पेमेंटद्वारेच भरणे आवश्यक आहे.