यंदाही शाळांच्या घंटा ऑनलाइनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:24 AM2021-06-03T04:24:50+5:302021-06-03T04:24:50+5:30

जानेफळ : कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत गेले वर्षभर लॉक-अनलॉक हा खेळ सुरू आहे. या सर्व घटनाक्रमात मात्र प्राथमिक शाळांचे ...

School bells are still online this year | यंदाही शाळांच्या घंटा ऑनलाइनच

यंदाही शाळांच्या घंटा ऑनलाइनच

Next

जानेफळ : कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीत गेले वर्षभर लॉक-अनलॉक हा खेळ सुरू आहे. या सर्व घटनाक्रमात मात्र प्राथमिक शाळांचे टाळेबंदीतील कुलूप गेल्या १४ महिन्यात उघडले गेले नाही. या चौदा महिन्यात मुलांनी ऑनलाइन शाळेचे बोट धरले असले तरी याच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या त्यामुळे यंदाही नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइनच होणार ही शक्यता अधिक आहे.

‘सांग.. सांग भोलानाथ पाऊस पडेल का, पाऊस पडून शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का’ हे बडबड गीत म्हणत दरवर्षी जून महिन्यात मुले शाळेची वाट धरतात. तथापि, कोरोनातील टाळेबंदीतील दीर्घ सुटीने मुलांना आता सुट्टीचाच कंटाळा आला आहे. दुसऱ्या लाटेचे रौद्र रूप अनुभवत असतानाच तिसरी लाट येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. ३१ मेपर्यंत असणारे लॉकडाऊन पुढील १५ दिवस वाढविले आहे. अनेक भागात १५ जून रोजी नूतन शैक्षणिक वर्षाची घंटा वाजते आणि त्याचे नियोजन १५ मेपासूनच केले जाते. त्यामुळे शाळांमध्ये लगबग सुरू होते. यावर्षीही गेल्या वर्षाचा कित्ता गिरवला जाण्याची शक्यता बळावली आहे. जून महिना सुरू झाला तरी शाळांसह शिक्षण विभागातही ‘शांतता’ नांदते आहेे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षातही शाळा ऑनलाइनच भरतात की काय, या प्रश्नाने पालक चिंताग्रस्त झाले आले आहेत. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसऱ्या बाजूूला शिक्षणाची अनिश्चितता अशा दुहेरी कात्रीत पालकवर्ग अडकला आहे.

ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण ठरतेय कुचकामी

शहरी भागातच ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. ग्रामीण भागात तर ते न पोहोचल्यासारखेच आहे. स्मार्टफोनची वानवा, कनेक्टिव्हिटी नसणे, इंटरनेटच्या सुविधेचा अभाव, इतर साधनांचाही तुटवडा आदी कारणांमुळे ऑनलाइन शिक्षण कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गळतीवर ही झाल्याचे उघड झाले आहे.

वरिष्ठ स्तरावरून अद्याप सूचना नाहीत

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून अजूनही कुठल्याच सूचना आलेल्या नाहीत. मध्यंतरी ऑनलाइनचेच संकेत मिळाले होते. नवीन पुस्तके अद्याप आलेली नाहीत. पुस्तकांची मागणी मात्र महिनाभरापूर्वीच नोंदविली आहे.

एम. एस. वानखेडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मेहकर

Web Title: School bells are still online this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.